पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप 
सांगली

Sangli Crime : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल; बामणोली येथील २०२२ मधील घटना

पुढारी वृत्तसेवा

सांगली : ‘मुलगा होत नाही व माहेरून पैसे आणत नाही’ या कारणांवरून पत्नीच्या डोक्यात बांबू मारून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पती कुमार भीमराव जाधव (वय ३८, रा. बामणोली, ता. मिरज) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एम. एस. काकडे यांनी जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची व सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.

बामणोली येथील कुमार जाधव याचा विवाह सुनंदा (वय ३०) यांच्याशी झाला होता. त्यांना तीन मुली होत्या. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून कुमार हा पत्नी सुनंदा यांचा सतत शारीरिक व मानसिक छळ करत होता. तसेच माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने तगादा लावत होता. या त्रासाला कंटाळून सुनंदा यांनी माहेरी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याचाच राग मनात धरून कुमार याने ५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री पत्नीशी पुन्हा तीव्र वाद घातला. वादाच्या वेळी रागाच्या भरात त्याने बांबूने सुनंदा यांच्या डोक्यात गंभीर हल्ला करून त्यांचा खून केला.

याप्रकरणी मृत सुनंदा यांचे भाऊ सतीश जगदाळे (रा. तावशी, ता. पंढरपूर) यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी मृत सुनंदा यांची १३ वर्षांची मुलगी स्वाती हिचा जबाब नोंदवून घेतला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. यामध्ये मृत सुनंदा यांची मुलगी स्वाती हिची साक्ष, भावाचा जबाब, वैद्यकीय व परिस्थितीजन्य पुरावा आणि संशयिताकडून जप्त केलेला बांबू हे पुरावे निर्णायक ठरले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि मुलीची प्रत्यक्षदर्शी साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने पती कुमार जाधव याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात न्यायालयातील पैरवी कक्षातील सहायक निरीक्षक एम. एम. शेख, महिला कर्मचारी यास्मीन शेख, उपनिरीक्षक पांडुरंग भोसले, वंदना पवार आणि अर्चना कांबळे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT