पत्नीचा खून केल्याप्रकरणी विट्याच्या जिल्हा सत्र न्यायालयाने पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  Pudhari News Network
सांगली

Sangli crime news : धनगाव येथे पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

विटा : पुढारी वृत्तसेवा : पत्नीचा खून केल्याप्रकरणी विट्याच्या जिल्हा सत्र न्यायालयाने पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तीन वर्षांपूर्वी पलूस तालुक्या तील भिलवडी पोलीस ठाण्याअंतर्गत धनगाव येथील गणपत दाजी पवार (वय ५०) यांनी दारू प्यायला पैसे दिले नाहीत, म्हणून डोक्यात कोयता आणि काठी घालून पत्नीचा खून केला होता. या खटल्यात न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी पती गणपत पवार यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दारूला पैसे न दिल्याने पत्नीचा खून

याबाबत अधिक माहिती अशी की, धनगाव गावातील सदाशिव भिमराव चव्हाण यांच्या पडीक शेतजमिनीत असलेल्या कॅनॉलजवळील झोपडीमध्ये गणपत पवार आणि त्यांची पत्नी कांताबाई पवार राहत होते. २८ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे ४ च्यापूर्वी गणपत पवार याला पत्नी कांताबाई हिने दारूला पैसे दिले नाही. त्यामुळे चिडून गणपत याने काठीने, तोंडावर, पायावर, पाठीवर तसेच कोयत्याने कपाळावर, हनुवटीवर आणि गळ्यावर घाव घालून गंभीर जखमी केले. यात तिचा खून झाला.

नवनाथ राठोड यांची भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद

याबाबत नवनाथ गोवर्धन राठोड यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गणपत पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. संशयित गणपत पवार हा ७ ऑक्टोबर २०२१ पासून न्यायालयीन कोठडीत होता. हा खटला विटा येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (दि.१९) झाली. विटा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी गणपत पवार यास सीआरपीसी २३५ (२) अन्वये दोषी धरून कलम ३०२ मध्ये जन्मठेप व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून व्ही. एम. देशपांडे यांनी काम पाहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT