जत : रेवनाळ (ता. जत) येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना दि. 23 नोव्हेंबररोजी पहाटे घडली. आक्काताई सतीश तुपसौंदर्य (वय 32) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. पती सतीश विठोबा तुपसौंदर्य (वय 38) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी सतीश याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आक्काताई या मजुरीचे काम करतात. पती सतीश यास पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून दोघांत नेहमी भांडणे व मारहाण होत होती. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य जत तालुक्यातील बागेवाडी येथे ऊस तोडणीसाठी गेले होते. मात्र 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा संशयाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला. दोघे रेवनाळ येथे घरी परतले.
घरी आल्यानंतर रात्री पती सतीश याने ‘उद्या सकाळपर्यंत तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी देत पत्नीला शिवीगाळ व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मुलांनी व सासूने भांडण सोडवल्यानंतर सर्वजण झोपले. पहाटे सतीश याने पत्नीला लाथ मारून उठवले. यावेळी त्याने हातात कुऱ्हाड घेऊन ‘आता तुला जिवंत ठेवत नाही’, असे म्हणत थेट नाकावर व डोक्यावर वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यात आक्काताई जोरात ओरडल्याने त्यांचा मुलगा प्रकाश जागा झाला. त्याने आरडाओरडा करत मदत मागताच सतीश तेथून पळून गेला. चुलत दीर तानाजी तुपसौंदर्य व सासू मदतीला धावून गेले. संशयित सतीश यास पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.