Girl Trafficking Case | नऊ देशांतील मुलींची सुटका Pudhari File Photo
सांगली

Girl Trafficking Case : नऊ देशांतील मुलींची सुटका

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; ‌‘अर्ज‌’ संस्थेचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

- गणेश मानस

सांगली : गोवा हे टुरिस्ट हब बनले आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांतून, तसेच परदेशातूनही मुली शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने गोव्यात येतात. या मुलींना आमिष दाखवून जाळ्यात ओढले जाते आणि त्यानंतर त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याच्या घटना ‌‘अर्ज‌’ संस्था व पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आढळल्या आहेत. बांग्लादेश, भूतान, भारत, केनिया, नेपाळ, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युगांडा, उझबेकिस्तान येथील मुलींची सुटका केली आहे.

काही वर्षांपूर्वी मुंबईतील डान्स बार बंद झाले. त्या ठिकाणी काम करणाऱ्या मुलींचा व्यवसाय बंद झाला. त्यातील काही मुली अन्य कामात गुंतल्या गेल्या, तर काही मुली वेश्या व्यवसायात उतरल्या. या मुलींची गोव्याला तस्करी सुरू झाली. गोव्यात येणाऱ्या सावजाच्या शोधात या ठिकाणच्या तस्करांनी जाळे फैलावले होते. शिक्षणासाठी, नोकरीसाठी आलेल्या मुलींना समाजमाध्यमांतून सावज बनवून त्यांचा व्हिसा, पासपोर्ट काढून घेतले जात होते आणि ब्लॅकमेल करून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याच्या घटना समोर आल्या.

शोषण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला 11 वर्षांनी शिक्षा

अर्ज संस्थेचे पांडे, डॉ. पाटकर म्हणाले, मुंबईत डान्स बारची चलती होती. महाराष्ट्र सरकारने डान्स बार बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यामध्ये काम करणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. काहीजणी त्यामध्ये रुळल्या, पण काहींना ते नको होते. त्यातील एक मुलगी ट्रॅफिकरच्या तावडीतून सुटून पळाली. ती रात्री गोव्यातील म्हापसा बसस्थानकावर गेली. रात्री उशिरा ती पोहोचल्यामुळे वाहने नव्हती. रात्री पेट्रोलिंग करीत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला ती दिसली. त्याने तिला ताब्यात घेतले व तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिच्यावर जबरदस्ती केली. पोलिस रेकॉर्डला तिला अन्य ठिकाणाहून ताब्यात घेतल्याचे दाखवले. परंतु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यानेच तिचे शोषण केल्याचे उघडकीस आले. त्यावेळच्या गोव्याच्या आयजीनी पुढाकार घेऊन त्या पोलिस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंद केला. 11 वर्षांनी त्या पोलिस अधिकाऱ्याला शिक्षा होऊन अखेर मुलीला न्याय मिळाला.

बाप म्हणतो... स्वत:च्या दोन मुली म्हणजे बँक बॅलेन्स आहे

बंगाली मुस्लिम मुलगी... लहानपणीच तिचे बंगाली मुस्लिम मुलाबरोबर लग्न झाले. ती पुण्यात आली. तिला एक मुलगी झाली. तिच्या पतीचे निधन झाले. काही दिवसांनी तिने एका हिंदू बंगाली मुलाबरोबर लग्न केले. त्याच्यापासून तिला आणखी एक मुलगी झाली. तिच्या नवऱ्याने गोव्यामध्ये जॉब मिळतो म्हणून म्हापशाला आणले आणि तिला म्हापशाच्या वेश्या मार्केटमध्ये उभे केले. तिच्या कमाईवर तो जगू लागला. काही दिवसांनी मेंदूच्या विकाराने ती मरण पावली. कारण नवरा दोन्ही मुलींचा प्रचंड छळ करीत होता. ‌‘या मुली म्हणजे माझा बँक बॅलेन्स‌’ आहे, असे तो म्हणत होता.

तस्करी रोखण्यासाठी ‌‘सायबर‌’चा पुढाकार

अर्ज ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात मानवी तस्करीविरोधात काम करीत आहे. परंतु बहुसंख्य तस्करी महाराष्ट्रातून होत आहे. मुलींची सुटका केल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी पाठवल्यानंतर मूळ तस्करापासून त्यांना धोका असतो. त्यामुळे ‌‘अर्ज‌’ने महाराष्ट्रात कार्यशाळा घेऊन जागृतीचे काम सुरू केले. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड रिसर्च (सायबर) महाविद्यालय समाजसेवा विभागाच्या सहकार्याने मानवी तस्करीवर कार्यशाळा घेतली. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील सामाजिक संघटनांना आमंत्रित केले. याचे संयोजन डॉ. डी. एम. भोसले यांनी केले. यात जिल्हा न्यायालय विधी प्राधिकरणाचाही सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT