बोरगाव : वाळवा तालुक्यातील हुबालवाडी येथील वीटभट्टीवर उभा असलेला कामगार मनोज चौडा यादव (वय 30, मूळ रा. रायगाव, छत्तीसगड) याच्यावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
बहे-हुबालवाडी रोडवर मोठ्या प्रमाणावर वीटभट्ट्या आहेत. तेथील मजूर याच परिसरात विटांच्या कच्च्या खोल्यांमध्ये राहतात. रविवारी मजुरांना बाजारासाठी सुटी देण्यात येत असते. कालही या मजुरांना सुटी असल्याने ते निवांत बसले होते. सायंकाळी वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरू झाला असतानाच घरातील मजूर घरासमोरील बाजूस मनोज यादव उभे होते, तर इतर मजूरही त्यांच्या खोलीसमोर उभे होते.
याचदरम्यान वीज यादव यांच्या अंगावर पडूली. हा आवाज इतका भयानक होता की आजुबाजूचा परिसर हादरून गेला. या ठिकाणी उपस्थित असणारे मालक हुबालवाडीचे माजी सरपंच हौसेराव भोसले, शेजारील भट्टीचे मालक बहेचे माजी सरपंच सुधीर रोकडे व अन्य मजुरांनी यादव यांच्याकडे धाव घेतली व त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच विजेमुळे यादव याचा मृत्यू झाला होता.
यादव याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला असून तो व त्याची बायको चार महिन्यांपूर्वीच या वीटभट्टीवर कामास आला होता. सुदैवाने यादव यांच्यापासून थोड्या अंतरावर असलेले अन्य मजूर व भट्टी मालक थोडक्यात बचावले.