सांगली : जिल्हा परिषदेत आरोग्य समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी मार्गदर्शन केले.  
सांगली

Sangli News : खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सात दिवसात माहिती द्या

उपाध्यक्ष ऋषिकेश लाड : रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असताना खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती ऋषिकेश लाड यांनी दिले. शासकीय सेवेत राहून खासगी प्रॅक्टिस करण्याची दुटप्पी भूमिका कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मासिक आढावा बैठकीत कामकाजाचा आढावा घेताना लाड बोलत होते.

लाड म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रांत सेवा बजावतानाच खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची माहिती संकलित करून अहवाल सात दिवसांमध्ये सादर करावा. या अहवालाची स्वतः पडताळणी करणार आहे. यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ३६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज १०० पेक्षा अधिक रुग्णांची बाह्यरुग्ण नोंदणी (ओपीडी) होत आहे. यातील आघाडीच्या १० आरोग्य केंद्रांमध्ये रोज सुमारे २०० किंवा त्याहून अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

नवीन औषध खरेदी आणि रुग्णवाहिका खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देऊन सर्व रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करण्याचे आदेशही देण्यात आले. ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यासाठी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींनी समन्वयाने काम करण्याचे बैठकीत ठरले. बैठकीस आरोग्य समितीचे सदस्य अरुणा पाटील, डॉ. शिल्पा दिवाणवार, अमित पाटील, अक्षय पाटील, मीना पाटील, प्रतीक पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT