सांगली : गुडबाय 2024... वेलकम 2025... बघता बघता 2024 संपले आणि 2025 चे उत्साहात, जल्लोषात आणि धूमधडाक्यात स्वागत झाले. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाची लाटच सांगलीसह जिल्ह्यात आली. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली. तरुणाईची पावले स्वतंत्र पार्ट्यांमध्ये थिरकली.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी सारी हॉटेल्स, ढाबे फुल्ल होते. बरेच लोक सहकुटुंब कोकण, गोव्याच्या सहलीवर गेले. ठिकठिकाणी ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रम पार पडले. दरम्यान, टवाळ टोळ्यांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रभर चोख बंदोबस्त ठेवला. 2024 संपले. बदललेले हवामान, आजार-संसर्ग आजारांच्या साथी, धुळीचे साम्राज्य, दारातूनच परत गेलेले पूर, खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुका, अपघात अशा चारही बाजूंनी आलेल्या संकटांनी त्रास देत 2024 संपले, पण काही चांगल्या, आशादायी, प्रेरणादायी घटनाही घडल्या. सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावर झुलत 2024 जाऊन 2025 आले आणि सर्वार्ंनी त्याचे उत्साहात, जल्लोषात स्वागतही केले.
नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सांगलीसह जिल्ह्यातील सारी हॉटेल्स, ढाबे सज्ज होते. प्रत्येकजणाने आपल्यापरीने वर्षाच्या स्वागतासाठीचे नियोजन केले होते. अपार्टमेंट, मंडळे, संस्थांमधून पार्टी, मैफल, ऑर्केस्ट्रा पार पडले. थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी सहकुटुंब हॉटेलमध्ये जाणार्यांची संख्या मोठी होती. महाराष्ट्रीयन, भारतीयसोबतच इटालियन, थाई, चायनीज फूडचा आस्वाद घेणे लोकांनी पसंत केले. सारा माहोल उत्साही, जल्लोषी होता.
व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. सायंकाळपासून ते अगदी पहाटेपर्यंत हॅपी न्यू इयरचे मेसेजेस पाठवले जात होते. सेलिब्रेशनच्या फोटोंनी सोशल मीडिया भरला होता. नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करू नका... दारू नको दूध प्या... असा संदेश देत ठिकठिकाणी दूध वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले गेले.