मिरज : मिरज-सांगली परिसरातील अनेक तरुणांना मैत्रीच्या बहाण्याने ब्लॅकमेल करून लाखो रुपयांना लुटण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. हा हनी ट्रॅपचा प्रकार असून मिरजेतील एका महिलेच्या टोळीने हा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
मिरजेतील वखार भाग परिसरातील एका महिलेने सोशल मीडियावर तरुणांशी मैत्रीच्या बहाण्याने त्यांना ब्लॅकमेल करून कोल्हापूर व कर्नाटकातील चिकोडी येथील तरुणांकडून लाखो रुपये लुटण्यात आल्याची तक्रारी आहेत. सोशल मीडियावर तरुणांशी मैत्री करून संबंधिताना या महिलेने मिरजेत फ्लॅटवर बोलवून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे व व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारी आहेत. मिरजेत फ्लॅटवर बोलवून संबंधित महिला व तिच्या साथीदारांनी सात ते आठ जणांकडून लाखो रुपये जबरदस्तीने लूटल्याची तक्रार आहे.
संबंधित महिलेचे दोन ते तीन साथीदार महिलेच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांना धमकावून मारहाण करून पैसे उकळत असल्याची सांगण्यात येत आहे. कोल्हापुरातील एका तरुणाने संबंधित महिला तिच्या साथीदारांविरुद्ध मिरज शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.