मिरज : मिरजेत हनी ट्रॅपच्या बहाण्याने अनेकांना गंडा घालणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नुसरत शेख, मोहसीन शेख, समीर कच्छी आणि रशीद सय्यद (सर्व रा. मिरज) यांचा समावेश आहे. याप्रकरणी चारही संशयितांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना सोमवार, दि. 24 नोव्हेंबरअखेर पोलिस कोठडी सुनावली आहे.
नुसरत शेख हिने तिच्या समाजमाध्यमावरील खात्यावरून अनेकांची ओळख केली होती. ती भावनिक संभाषण करून त्यांना फ्लॅटवर बोलवायची. संबंधित फिर्यादीसही तिने अशाच प्रकारे फ्लॅटवर बोलावले होते. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अन्य संशयितांनी ‘आमच्या बहिणीसोबत एकटा काय करत आहेस?’ असे म्हणून फिर्यादीस पट्ट्याने मारहाण केली. तसेच अर्धनग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडील सोन्याची चेन, अंगठी असा 1 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार मिरज शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे.