सांगली : इंदिरानगरमधून बेपत्ता झालेल्या बांधकाम कामगार रोहित मुकेश म्हैसाळे (वय 29) याचा खून केल्याप्रकरणी हद्दपार असलेला गुन्हेगार श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय 26, रा. सावंत प्लॉट, इंदिरानगर, सांगली) या मुख्य सूत्रधाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.
इंदिरानगरमध्ये राहणारा रोहित म्हैसाळे हा सेंट्रिंगची कामे करत होता. आई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असून ती आजारी असल्याने बदली कामगार म्हणून तो कामावर जात होता. दि. 26 फेब्रुवारीरोजी सकाळी सात वाजता तो बदली कामावर गेला होता. जिल्हा परिषदेसमोर तिघेजण दुचाकीवरून तेथे आले होते. रोहित आणि त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रोहित तेथून पळाला होता. त्यानंतर रोहितला पकडून त्याचे अपहरण करून गाडीवरून विठ्ठलनगर येथील एका शाळेजवळ निर्जनस्थळी नेले. तेथे त्याच्यावर धारदार हत्यारांनी वार केले. तो मृत झाल्यानंतर मृतदेह बॅरेलमध्ये टाकून त्यात दगड भरून तो पडीक विहिरीत फेकला होता. त्यानंतर तिघे परतले होते.
इकडे रोहित घराकडे न परतल्यामुळे नातेवाईकांनी शोध घेऊन विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपास करताना पोलिसांना वेगळीच शंका आली. त्यादृष्टीने तपास करताना रोहितचा खून केल्याचा संशय बळावला. तपास करून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यानी खून करून मृतदेह टाकलेली विहीर दाखवली. तेव्हा पोलिसांनी विहिरीत बॅरेलमध्ये कोंबलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर मुख्य संशयित गोट्या कलढोणे याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल केला. गोट्या कलढोणे याला शुक्रवारी ताब्यात घेऊन अटक केली.
हद्दपार असताना सांगलीत कसा
गोट्यावर 10 फेब्रुवारीरोजी हद्दपारीची कारवाई केली. हद्दपारीचा आदेश डावलून तो सांगलीत आल्याचे स्पष्ट झाले आहे. तो सांगलीत कसा काय आला. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई का केली नाही. वेळीच कारवाई झाली असती तर खून झाला असता का, असे सवाल उपस्थित होत आहेत.