सांगली : शहराला मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला, ज्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. दिवसभर वातावरणात उष्णता जाणवत होती, सायंकाळच्या सुमारास तुरळक पावसाला सुरुवात झाली. मात्र, रात्री दहाच्यानंतर पावसाने रौद्र रूप धारण केले आणि जोरदार मुसळधार कोसळण्यास सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटाने आणि ढगांच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक जलमय झाले. सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य चौकात गुडघाभर पाणी साचले, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. शहरातील स्टेशन चौक, शिवाजी मंडई आणि राजवाडा चौक, राममंदिर चौक, झुलेलाल चौक यासारख्या नेहमी गजबजलेल्या भागांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.