सांगली : सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी दुपारनंतर जोरदार पावसाने मुसळधार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या या पावसामुळे शेतकरी सुखावला असला, तरी सांगली शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते.
यंदा हवामान विभागाने पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पावसाचे आगमन उशिरा झाले आणि सुरुवातीच्या काही सरींनंतर पावसाने उघडीप दिली होती. मात्र, आता पुन्हा पावसाने जोर धरला आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण राहिल्यानंतर दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यामध्ये सरासरी ४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये शिराळा तालुक्यात सर्वाधिक १४.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मिरज ३.०, जत०.४, खानापूर २.५, वाळवा ५.०, तासगाव ०.९, आटपाडी ९.२, कवठेमहांकाळ ०.९, पलूस २.३ आणि कडेगाव तालुक्यात ४.३ मि.मी. पाऊस झाला आहे. १ जूनपासून विचार करता शिराळा तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ५५२.२ मि.मी. पाऊस झाला आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील महत्त्वाच्या वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत २४.५२ टी.एम.सी. इतका पाणीसाठा जमा झाला आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. आहे. इतर प्रमुख धरणांपैकी कोयना धरणात ६३.९६ टी.एम.सी. (क्षमता १०५.२५), अलमट्टी १००१.३७ (क्षमता १२३), दूधगंगा १०.३९ (क्षमता २५.४०), तर धोम धरणात ८.९० टी.एम.सी. पाणीसाठा आहे. सध्या विविध धरणांमधून विसर्ग सुरू असून कण्हेर धरणातून ३४० क्युसेक, धोम बलकवडीतून ९६२ क्युसेक, अलमट्टी धरणातून १६,३७३ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
कृष्णा नदीची पातळी नियंत्रणात
सध्या सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पातळी १० फूट (इशारा पातळी ४० फूट) तर हरिपूर येथील अंकली पुलाजवळ १२.०८ फूट (इशारा पातळी ४५.११ फूट) इतकी आहे. नदीकाठची परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असली, तरी पुढील पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सतर्क आहे.