सांगली : शहर व परिसरात रविवारी सलग आठव्या दिवशी संततधार पाऊस सुरूच राहिला. यामुळे शहराबरोबरच उपनगरांची दैना उडाली आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून, सखल भागात पाणी साचून राहिले आहे. संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. 1 ते 25 मे या कालावधीत जिल्ह्यात 174.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत 11 मि.मी. पावसाची नोंद झाली.
सांगली जिल्ह्यात सलग आठ दिवस पाऊस कोसळत आहे. शहर परिसरात शनिवारी रात्री, त्यानंतर रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस बरसत राहिला. यानंतर सायंकाळी पाचनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. थांबून, थांबून हा पाऊस बरसत राहिला. आठ दिवसांपासून कोसळणार्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सखल भागात पाणी साचून राहिले आहे. स्टेशन चौक, राजवाडा चौक, शिवाजी मंडई, सिव्हिल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, छत्रपती शिवाजी स्टेडियम, विश्रामबाग चौक, मुख्य बसस्थानक आदी परिसरात पाणी साचून राहिले आहे. खणभागासह अनेक ठिकाणी गटारी तुंबत असून पाण्याचा निचरा संथगतीने होत आहे.
शामरावनगर, संजयनगर, कोल्हापूर रोड, शंभरफुटी रोड, कलानगर, काकानगर आदी उपनगरांत पावसाने दैना उडाली आहे. सर्वत्र चिखल साचून राहिला आहे. वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, हवेत गारठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक जर्किन, रेनकोट, टोपी घालून वावरताना दिसत आहेत. दत्त-मारुती रोड, मित्रमंडळ चौक, शिवाजी मंडईतील किरकोळ विक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. शनिवारच्या बाजारावरही याचा परिणाम दिसून आला.
मिरज : 162.3 (310 )
जत : 124.7 (286)
खानापूर : 200.3 (482)
वाळवा : 211.6 (435)
तासगाव : 135.7 (271)
शिराळा : 224 (436)
आटपाडी : 164.8 (164)
कवठेमहांकाळ : 154.9 (501)
पलूस : 139.4 (1244)
कडेगाव : 223.7 (1398)
एकूण : 174.2 (358)