तिहेरी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू  
सांगली

Sangli Accident : तिहेरी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

योगेवाडीजवळ घटना; महिला गंभीर जखमी; ट्रेलर, दुचाकी व मोटारीची धडक

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : चिपळूण-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर योगेवाडी (ता. तासगाव) गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी ट्रेलर, मोटार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात जत येथील आरोग्य सेवकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मणेराजुरी (ता. तासगाव) येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून, दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. तुकाराम अवधूत खोत (वय २५, रा. जालिहाळ बुद्रुक, ता. जत) असे मृत आरोग्य सेवकाचे नाव आहे, तर सुजाता किरण तोडकर (वय ४५, रा. मणेराजुरी) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

आरोग्य सेवक सुदीप लंगोटे यांच्या मावशी मणेराजुरी येथे राहतात. सुदीप हे तुकाराम यांच्यासह आपल्या मावशीला भेटण्यासाठी मणेराजुरी येथे आले होते. त्यानंतर मावशीला सोबत घेऊन जतकडे जात असताना योगेवाडीजवळ हा अपघात घडला. जतकडून चुकीच्या दिशेने येणारा ट्रेलर (क्र. एनएल ०१ एडी ०५२२) आणि मणेराजुरीकडून जतकडे जाणारी मोटार (क्र. एमएच १० एफए १७४५) यांच्यात योगेवाडी हद्दीत महामार्गावर जोरदार धडक झाली. ट्रेलर दुचाकीच्या (क्र. एमएच १० ईएस ६५३८) पुढे जात असताना समोरून आलेल्या मोटारीस धडकल्याने हा अपघात घडला. यावेळी दुचाकीस्वारही किरकोळ जखमी झाला.

मोटारीच्या पुढील सीटवर बसलेले तुकाराम खोत यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की, एअरबॅग उघडूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही. अपघातात मोटारीत मागील सीटवर बसलेल्या सुजाता तोडकर गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिस आणि तासगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विशाल टकले, उपनिरीक्षक विनय गोडसे घटनास्थळी दाखल झाले.

वडिलांच्या जागेवर नोकरी; संसाराची स्वप्ने अधुरीच

वय अवघे २५ असलेल्या तुकाराम खोत यांच्या आयुष्याची नुकतीच सुरुवात झाली होती. दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांना आरोग्य विभागात नोकरी मिळाली. वडिलांच्या माघारी कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तुकाराम यांचे अद्याप लग्न झाले नव्हते. या अपघाताने त्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT