सांगली : पुढारी वृत्तसेवा
सर्वांना बरोबर घेऊन समाज बळकट करणे आणि देशाला पुढे नेणे यासाठी हातभार लावतो, तोच खरा मराठा. मग तो कोणत्याही जातीचा, जमातीचा, राज्याचा असो, तोच खरा मराठा. त्या व्यापक हिताची जपणूक सांगलीच्या मराठा समाज संस्थेत होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी केले.
शरद पवार म्हणाले, मराठा याचा अर्थ एक जात नव्हे. मराठा याचा अर्थ या राज्यातील, देशातील ज्या जाती, जमाती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून पुढे जात आहेत, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचे काम करत आहेत. सर्वांना एकत्र करून त्याच्या सामूहिक संघटनेतून समाज उभा करण्याचे काम मराठा समाज सांगली ही संस्था करत आहे. या संस्थेत जात-पात, भेद मानला जात नाही. समाजातील लहान घटकांचा सन्मान याठिकाणी होतो. समाजा समाजात वितुष्ट वाढेल असे काम याठिकाणी केले जात नाही. सर्वांना बरोबर घेऊन समाज बळकट करणे आणि देशाला पुढे नेणे यात हातभार लावतो, तोच खरा मराठा. मग तो कोणत्याही जाती, जमाती, राज्याचा असो, तो खरा मराठा, या व्यापक हिताची जपणूक मराठा समाज सांगली या संस्थेत होत आहे.
सांगलीत आणि कोल्हापुरात कसबा बावडा येथे शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण होत आहे. दोन्ही पुतळे शंभर नव्हे, एक हजार वर्षे अबाधित राहतील. कारण पुतळ्याला कोणाचा हात लागतो, हे महत्त्वाचे आहे. पुतळा कोणी केला, त्याचे शिल्पकार कोण, कोणी बसविला आणि कुणाच्या हस्ते त्याचे पूजन झाले, हे महत्त्वाचे असते, असे सांगत काँग्रेस नेते डॉ. विश्वजित कदम यांनी सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा केवळ आठ महिन्यांत पडल्याप्रकरणी महायुती सरकारला टोला लगावला.