सांगली : राज्यात प्रतिदिन दुधाची मागणी २ कोटी ते २ कोटी २० लाख लिटरच्या घरात आहे. प्रत्यक्षात प्रतिदिन संकलन मात्र १ कोटी ७५ लाख लिटरच्याच घरात होते. याचाच अर्थ उत्पादनापेक्षा जवळपास २५ ते ३० लाख लिटर जादा दूध येते, ते भेसळबहाद्दरांच्या ‘अव’कृपेनेच येते, असेच म्हणावे लागेल. दुधातील ही जीवघेणी भेसळ रोखण्याची गरज आहे. याखेरीज पांढऱ्या दुधावर टपलेल्या काळ्या बोक्यांना चाप बसणार नाही.
सातत्याने मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण व्यस्त राहिलेल्या दुधात सर्रास जीवघेण्या रसायनांची भेसळ होते हे आता उघड झाले आहे. यातून फॅट वाढवून दुग्ध व्यावसायिक पैसे मिळवित असले तरी ग्राहकांचा जीव मात्र धोक्यात येऊ लागला आहे. दुधातील प्रोटीन्स्चे प्रमाण वाढविण्याच्या नावाखाली वापरासाठी कठोर बंधन असलेल्या मेलामाईनचा वापर तर कळस गाठत असल्याचे चित्र आहे.
या ‘दाट’ दुधाची भेसळ अनेक वर्षे खुलेआम होत असल्याचे ,‘अन्न व औषध’ प्रशासन विभाग अधूनमधून, तसेच कधीतरीच करत असलेल्या भेसळखोरांविरोधातील कारवाईतून स्पष्ट होते. फार पूर्वी दुधात पाणी मिसळून भेसळ व्हायची. पण आता दूधभेसळबहाद्दरांनी पाण्यापेक्षा दुधाची घनता कशी वाढेल यासाठी नवनवे फंडे सुरू केले आहेत. साखर घालून दुधाची घनता वाढवली जाते, पीठ, आरा रूट, मक्याचे सत्त्व कालवून दुधाची घनता वाढवली जाते.
निकष धाब्यावर...
भारतीय मानकांनुसार दुधात मेलामाईनचे प्रमाण १ अब्जांशापेक्षा कमी असणे सुरक्षित मानले जाते. अन्य दुग्धजन्य पदार्थांमध्ये २५ अब्जांशापेक्षा ते अधिक नसावे असे म्हटले आहे.
एफएसएसएआय यांच्यावतीने दुधातील घटक पदार्थांचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार माणसाला पिण्यायोग्य दूध ठरवले जाते. सीजीएसआय या संस्थेने सन २०२२-२३ मध्ये ग्राहकांकडून ८४८ दुधाचे नमुने मिळवले होते. त्यात केवळ २९ टक्के म्हणजे २४६ नमुने एफएसएसएआयच्या दर्जानुसार असल्याचे उघड झाले होते. म्हणजेच ७२.६६ टक्के दूध भेसळयुक्त होते. विशेष म्हणजे या पाहणीत आवश्यक प्रमाणात दुधात फॅट्स आढळून आले नाहीत.
जिल्हानिहाय तपासणी प्रयोगशाळांची गरज
दुधातील भेसळीचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. यातून ग्राहकांचे आरोग्य हे धोक्यात येऊ लागले आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अशा दूध तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार होत्या. मात्र शासनाच्या अनेक घोषणांप्रमाणे ही घोषणा देखील हवेतच विरली असल्याचे निश्चितपणे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या ‘अन्न व औषध’ प्रशासन विभागाने भेसळखोरांविरोधात सातत्याने मोहीम सुरू ठेवण्याची खरी गरज आहे.
भेसळीचा घातक प्रकार
दुधात भेसळीसाठी आता मेलामाईनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. खरे तर प्लॅस्टिकच्या वस्तू बनवण्यासाठी मेलामाईनचा वापर होतो. प्लॅस्टिक गंजत नाही, कुजत नाही, दीर्घकाळ टिकते, तसे मेलामाईन वापरून केलेले दूधही दीर्घकाळ टिकते. अर्थात ते पोटात गेल्यावर त्यातील मेलामाईन रासायनिकदृष्ट्या मंद क्रियाकारी असल्याने पचत नाही. यातूनच घातक व्याधींना आमंत्रण मिळते. खास करून मेलामाईनमध्ये नत्र असते आणि प्रथिनांमध्येही नत्र असते. त्यामुळे दुधामधील मेलामाईनचे अस्तित्व शोधणे जिकिरीचे ठरते, याचाच फायदा भेसळखोर घेत आहेत.