हरिपूर : येथील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर असलेल्या प्रसिद्ध संगमेश्वर मंदिरात आजपासून श्रावणी यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्त संपूर्ण हरिपूर गाव सजले असून, पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावणी सोमवारच्या पहिल्या दिवशी, पहाटे 4 वाजता काकड आरती आणि रुद्राभिषेकाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर आरती आणि महापूजा करण्यात आली. ओंकार गुरव आणि विजय गुरव यांनी संगमेश्वराच्या पिंडीला आकर्षक फुलांची सजावट केली होती. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. पावसाची रिपरिप सुरू असूनही, कृष्णा-वारणा संगमावरील पाणी पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांचा उत्साह कायम होता. हरिपूर ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीने यात्रेकरूंच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची चोख व्यवस्था केली होती. सरपंच राजश्री तांबवेकर, अरविंद तांबवेकर, गणपती साळुंखे, देवस्थानचे अध्यक्ष दिग्विजय बोंद्रे व उपाध्यक्ष आणि पोलिस पाटील उमाकांत बोंद्रे, शशिकांत कुरणे यांनी यात्रेचे नियोजन केले. यात्रेच्या परिसरात खेळणी, खाद्यपदार्थ आणि महिलांसाठी दागिन्यांचे अनेक स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्यामुळे गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.