Mango season Pudhari
सांगली

Mango season: हापूस आंब्याचा हंगाम चालला ३५ दिवसच

गतवर्षाच्या तुलनेत निम्मीच आवक; उलाढाल मात्र २० कोटीवर

पुढारी वृत्तसेवा
अंजर अथणीकर

सांगली : वाढत्या उष्णतेमुळे यंदा देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याच्या हंगामाचा कालावधी मोठ्या प्रमाणात घटला. जवळपास दोन महिने चालणारा हंगाम कसाबसा ३५ ते ४० दिवस चालला.

यंदा फळधारणा कमी झाल्यामुळे उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत घट झाली. याचा थेट परिणाम म्हणून बाजारात आवक कमालीची कमी झाली आणि दर आवाक्याबाहेर गेले. अपुऱ्या आवकेमुळे बाजारात अस्सल हापूसचे दर खूप चढे राहिले. देवगड व रत्नागिरी हापूसचे प्रति डझन दर साधारणपणे ५०० ते ७०० रुपये राहिले. यंदा हंगाम २५ एप्रिल ते सर्वसाधारपणे ३० मेपर्यंत राहिला. प्रत्येक वर्षी हा हंगाम १० ते १५ एप्रिलपासून ते मेअखेरपर्यंत चालतो. यंदा हा हंगाम खूपच घटला.

कर्नाटक हापूस, तोतापुरी, पायरीचा हंगामही यावर्षी उशिरापासून प्रारंभ झाला आहे. २० एप्रिलपासून याची आवक सुरु झाली. गेल्या पंधरवड्यापासून या आंब्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली. यंदा कर्नाटक हापूसे सर्वसाधारणे दर दीडशे ते दोनशे रुपये डझन राहिले.

विष्णुअण्णा फळ मार्केटमधून सांगली जिल्ह्यासह जयसिंगपूर, सांगोला, कर्नाटकमधील अथणी, कागवाड, चिकोडी तालुक्यात विक्री झाली. यंदा कोकणातील आंब्याच्‍या बागा सांगलीतील वीसभर व्यापाऱ्यांनी घेतल्या होत्या.

देवगड, रत्नागिरी हापूसचा हंगाम यंदा १५ ते २० दिवस अगोदरच संपला. दर तेजीत राहिल्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत उलाढाल जवळपास तेवढीच राहिली. पावसाळा लांबल्यामुळे जूनच्या पंधरवड्यानंतरही कर्नाटक आंब्याचा हंगाम सुरूच आहे. कर्नाटक आंब्याचा दर यंदा गतवर्षाच्या तुलनेत निम्माच आहे.
- चंद्रभान शर्मा, घाऊक आंबा व्यापारी, विष्णुअण्णा फळ मार्केट, सांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT