चंद्रकांत पाटील  Pudhari File Photo
सांगली

‘शक्तिपीठ’साठी शेतकर्‍यांच्या संपूर्ण समाधानाचा प्रयत्न

पालकमंत्री पाटील : कवलापूरच्या जागेवर चार्टर एअरपोर्ट बनवू

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शक्तिपीठ महामार्गाला येथील शेतकर्‍यांचा विरोध आहे. मात्र, अशा मार्गामुळे विकासाला गती मिळत असते. त्यामुळे ‘शक्तिपीठ’ला जमिनी मिळाव्यात, यासाठी शेतकर्‍यांचे संपूर्ण समाधान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कवलापूर विमानतळाच्या सध्याच्या जागेवर प्रथम चार्टर विमानांसाठी एअरपोर्ट बनवू, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, समृद्धी महामार्गालाही सुरुवातीला शेतकर्‍यांचा विरोध झाला. मात्र, पुरेशी भरपाई दिल्यानंतर अडथळे दूर झाले. समृद्धी महामार्गावर 65 हजार कोटी रुपये खर्च झाले. मात्र, प्रवास वेळेतील बचत, डिझेल व पेट्रोल इंधनात होणारी बचत, शेतकर्‍यांचा शेतीमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचण्यासाठी झालेली सोय पाहता, हा 65 हजार कोटी रुपयांचा खर्च पाच वर्षांत भरून निघेल. रस्ते, धरणे, उद्योग उभारण्यासाठी जमिनी दिल्या जाणार नाहीत, तर मग विकास कसा होणार?

कवलापूर विमानतळाबाबत मार्च 2025 चे विधिमंडळ अधिवेशन झाल्यानंतर आढावा घेतला जाईल. विमानतळासाठी सध्या असलेली जागा अपुरी आहे. जमिनीचे अधिग्रहण करावे लागेल. जमीन अधिग्रहणात अनेक अडचणी असतात. सध्याच्या जागेवर धावपट्टी छोटी होईल. कराड विमानतळाप्रमाणे केवळ 12 ते 13 प्रवासी क्षमतेचे चार्टर विमान उतरू शकेल. येथे प्रथम तसे करू. त्यानंतर कोल्हापूर विमानतळाप्रमाणे टप्प्या-टप्प्याने कवलापूर विमानतळाचाही विकास करता येईल. कोल्हापूरला विमानतळ असल्याने सांगलीतही विमानतळ कशासाठी?, असे मी म्हणणार नाही. कवलापूर विमानतळासंदर्भात पुढच्या महिन्यात आढावा घ्यायला सुरुवात करू.

केंद्रीय अर्थसंकल्पामधून राज्याला बळ

पाटील म्हणाले, केंद्र सरकारने ‘सबका विकास’द्वारे राज्याच्या विकासाला बळ दिले आहे. अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंत आयकर माफी जाहीर केल्याने मोठा दिलासा मिळाला. पायाभूत सुविधा तसेच उद्योग, व्यापाराला चालना मिळणार आहे. राज्यात ‘अमृत भारत’मधून 128 रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण करण्यात येईल. 2014 मध्ये राज्यात 5 हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होते, ते 2024 मध्ये 24 हजार किलोमीटर झाले. कर्करोगासह दुर्मीळ आजारांवर 36 जीवरक्षक औषधांवरील कर माफ केला.

राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 10 मार्चला मांडण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पाच्या धर्तीवर राज्याचा अर्थसंकल्पही सर्व घटकांना दिलासा देणारा असेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT