विठ्ठल नलवडे
शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली अभयारण्यात अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या राखाडी डोक्याच्या मत्स्य गरुडाची नोंद या परिसरात झाली आहे. पक्षी अभ्यासक संजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या गरुडाचे दर्शन घेतले. पश्चिम घाटातील सह्याद्री रांगांमध्ये याचे वास्तव्य आढळणे, ही पर्यावरणदृष्ट्या अत्यंत सकारात्मक घटना मानली जात आहे. विशेषतः कोयना आणि चांदोली या जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात या शिकारी पक्ष्यासाठी पोषक वातावरण असल्याचे या नोंदीवरून स्पष्ट होते.
या गरुडाचे डोके राखाडी रंगाचे असून, त्याचे शरीर तपकिरी आणि पोटाचा भाग पांढरट असतो. त्याची शेपटी पांढरी असून टोकाला काळी किनार असते. नावाप्रमाणेच या गरुडाचे मुख्य खाद्य मासे आहे. जलाशयांच्या काठावरील उंच झाडांवर बसून हा पक्षी पाण्याचा वेध घेतो आणि क्षणार्धात मासा पकडतो. हा पक्षी साधारणपणे संथ वाहणाऱ्या नद्या, सरोवरे, तलाव आणि मोठ्या जलाशयांच्या परिसरात राहणे पसंत करतो. पर्यावरण तज्ज्ञांच्यामते, राखाडी डोक्याचा मत्स्य गरुड हा परिसंस्थेतील की-स्टोन प्रजातींपैकी एक आहे. जलाशयातील अन्नाची साखळी सुस्थितीत असल्याचे हा पक्षी दर्शवतो.
सह्याद्रीच्या घनदाट अरण्यात अशा दुर्मीळ प्रजातींचे अस्तित्व टिकून राहणे हे वन विभागाच्या संवर्धन प्रयत्नांचे यश आहे. या पक्ष्यांच्या अधिवासाचे रक्षण करणे ही आता काळाची गरज आहे.- प्रणव हसबनीस, निसर्ग मार्गदर्शक