आरोपी वनिता पाटील, तेजस पाटील, भीमराव हुलवान  Pudhari Photo
सांगली

विम्याच्या पैशाचा मोह: पतीला धाडले यमसदनी !

Sangli Crime | पत्‍नीने मुलाबरोबर संगनमत करुन रचला डाव ; शिरढोण येथील मृत्यूचे गुढ उकलले

पुढारी वृत्तसेवा

मळणगाव : पुढारी वृत्तसेवा

पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसेच हातउसने घेतलेले पैसे मागण्यासाठी घरी येणाऱ्या लोकांना वैतागून मुलगा आणि त्याच्या मित्रांशी संगनमताने पतीच्या खून करुन केलेला अपघाताचा बनाव कवठेमहांकाळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

बाबूराव दत्तात्रय पाटील रा. शिरढोण ता. कवठेमहांकाळ जी. सांगली यांच्या खूनप्रकरणी शनिवारी रात्री कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पत्नी वनिता बाबूराव पाटील वय ४०, मुलगा तेजस बाबूराव पाटील वय. २६ आणि त्याचा मित्र भिमराव गणपतराव हुलवान वय ३० तिघेही रा. शिरढोण ता. कवठेमहांकाळ जि. सांगली यांचे विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिली आहे.

१० फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर नरसिंहगाव ता. कवठेमहांकाळ गावच्या हद्दीत हॉटेल आर्याच्या जवळ बाबूराव दत्तात्रय पाटील वय ५४ रा. शिरढोण यांचा मृतदेह रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या दुभाजकाच्या नजीक आढळून आला होता.

बाबूराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील यांने घटनास्थळावरुन मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे आणला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.स्वप्नाली पाटील यांनी दिली. यानंतर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत होते.

दरम्यान घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्याने तपासाची चक्रे गतीने फिरविण्याचे काम पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी केले. यामुळेच कोणताही धागेदोरे हाती नसताना पोलिसांनी अपघाताचा बनाव उघडकीस आणला.

शुक्रवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आले होते. शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भिमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबूराव पाटील नरसिंहगाव गावाचे जवळील मिरज ते पंढरपुर जाणारे हायवे क्रमांक १६६ वरील आर्या हॉटेलच्या जवळील रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटुन खून केल्याचे कबूल केले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवशरण करीत आहेत.

उलट तपासणीत बनाव उघडकीस

पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूराव पाटील यांचा मृतदेह सापडलेनंतर केलेल्या चौकशीत पत्नी आणि मुलाने घटना घडली तेव्हा ते कराड येथे असल्याचे सांगितले होते. पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढलेनंतर ही माहिती खोटी असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी गावातील सी.सी. टी.व्ही. फूटेज तपासले असता काही धागेदोरे सापडले. पत्नी, मुलगा आणि तिसऱ्या संशयिताचे फूटेज सापडले होते. आणखी चौकशी केली असता पत्नी आणि मुलगा यांच्यावरील संशय बळावला होता. यानंतर आणखी बरेच धागेदोरे मिळताच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पोलिस चौकशीत उलट तपासणी वेळी या तिघांनी खूनाची कबूली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT