तासगाव : गव्हाण (ता. तासगाव) येथील निवृत्त सैनिक अधिकारी दत्तात्रय जाधव यांनी त्यांच्या ‘अनुष्का’ या द्राक्ष वाणाच्या फळ छाटणी हंगामास शुक्रवार, दि. 25 रोजी सुरुवात केली. तासगाव तालुक्यात सर्वात प्रथम द्राक्ष छाटणी घेण्याचे श्रेय गव्हाण गावाला मिळाले आहे.
जाधव हे प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांची दोन एकर द्राक्षबाग आहे. सुपर सोनाका, माणिक चमन व अनुष्का या वाणाच्या त्यांच्या द्राक्षबागा आहेत. यातीलच अर्धा एकर क्षेत्रावर त्यांची अनुष्का वाणाची द्राक्षशेती आहे. त्यांनी आधुनिक पद्धतीने मंडप वेलीवर प्लास्टिकचे अच्छादन केले आहे. दरम्यान, दत्तात्रय जाधव यांची जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची मानसिक तयारी आहे. इतर द्राक्ष बागायतदारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आगाप द्राक्ष फळ छाटणी घेतल्याने द्राक्षे लवकर विक्रीसाठी तयार होतात. त्यातून द्राक्ष बागायतदारांना अधिक दर मिळाल्याने अधिक नफा होतो. त्यामुळे अनेक शेतकरी आगाप फळ छाटणी घेत असतात. यावेळी प्रगतशील शेतकरी गजानन पाटील यांच्याहस्ते फळ छाटणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुभेदार विष्णू जाधव, पोलिस अधिकारी पोपट जाधव, उमेश जमदाडे, प्रल्हाद जाधव, ओंकार जाधव उपस्थित होते.