कवठेमहांकाळ : द्राक्षबागेच्या नापिकीमुळे बँकेचे 20 ते 25 लाख रुपयांचे कर्ज फेडायचे तरी कसे? या विवंचनेत मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतकऱ्याने मंगळवार, दि. 17 रोजी सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतापराव श्रीपतराव शिंदे (वय 54) असे मृताचे नाव आहे.
द्राक्षबाग वाया गेल्याने दिवसेंदिवस वाढणारा ताण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि भविष्याची अनिश्चितता, यामुळे ते पूर्ण खचले होते. त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. सकाळी शेतात गेलेल्या ग्रामस्थांना ही घटना समजली. उत्तरीय तपासणी केल्यानंतर मळणगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
प्रतापराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलगा इचलकरंजी येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तीन एकर बाग तोडून टाकली
हवामानातील अनियमितता आणि रोगराईमुळे यावर्षी त्यांच्या तीन एकर बागेला द्राक्षेच लागली नाहीत. त्यामुळे संपूर्ण वर्षभराचा खर्च वाया गेला. शेवटी निराश होऊन त्यांनी संपूर्ण द्राक्षबाग तोडून टाकली. ही घटना त्यांच्या मानसिक स्थितीवर मोठा आघात करणारी ठरली.
या घटनेची गंभीर दखल घेऊन शासनाने शिंदे यांचे संपूर्ण कर्ज माफ करून कुटुंबीयांना दिलासा द्यावा. तसेच अशी वेळ दुसऱ्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यावर येऊ नये, यासाठी तसेच द्राक्षशेती व द्राक्ष बागायतदार वाचविण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.- सुरेखा जाधव, सरपंच, मळणगाव