सांगली

Gram Panchayat election: कारभारी निवडण्यासाठी सरसावले गावकरी !;८३ ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मात्र शांततेत मतदान

मोनिका क्षीरसागर

सांगली; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतीसाठी रविवार (दि.५) सकाळपासून उत्साहात आणि चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणचे किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत सुरु राहिले. संवेदनशील गावामध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यामध्ये सकाळी साडे नऊपर्यंत १४ टक्के तर साडेअकरापर्यंत ३४ तर दुपारी दीड वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झाले. सकाळी अकरानंतर मतदानाला गती आली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बाहेरगावी राहिलेल्या मतदारांना आणण्यावर सर्वच उमेदवारांचा जोर होता.

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. त्यानंतर उमेदवारांनी घरोघरी मतदारांची भेट घेऊन प्रचाराला प्रारंभ केला. हा प्रचार आज (दि.५) रविवारी दिवसभरही सुरु होता. मतदान केंद्राबाहेर थांबून उमेदवार व पॅनेलचे प्रमुख मतदारांना आवाहन करीत होते. पोटनिवडणुकीसह ८३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. एकूण ८४७ सदस्यपदासाठी १ हजार ५३०उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, सरपंचपदाच्या ८१ जागेसाठी निवडणुकीत २२२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक होत असलेल्या तासगांव तालुक्यातील चिखलगोठण, कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी, मळणगाव, ढालगाव, कडेगाव तालुक्यातील मौजे चिंचणी, शाळगाव आणि पलूस तालुक्यातील कुंडल अशा एकूण ७ गावामध्ये मतदाना दिवशीचे आठवडा बाजार स्थगित करण्यात आले होते. जानराववाडी, हरिपूर, नांद्रे (ता. मिरज), मळणगाव, कोकळे, ढालगाव, दुधेभावी, ढोलेवाडी, देशींग (ता. कवठेमहकांळ), कुंडल, अमणापूर (ता. पलूस) या संवेदनशिल जाहीर करण्यात आलेल्या गावामध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धिम्या गतीने सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सकाळी अकरानंतर मात्र मतदान केंद्रसमोर रांगा लागू लागल्या.

SCROLL FOR NEXT