ईश्वरपूर : कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाची 13 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात कारागृह पोलिस हवालदारासह त्याच्या तीन नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
बाजीराव जोती पाटील (कारागृह हवालदार, रा. वाडीभाग, ता. शिराळा; सध्या रा. विसापूर, जि. अहिल्यानगर) गणेश दिनकर जाधव, नागेश दिनकर जाधव, मनिषा गणेश जाधव (सर्व रा. पाचगाव, जि. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत अर्जुन आण्णासाहेब देशमुख (रा. विष्णुनगर, कापूरवाडी-पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी अर्जुन देशमुख यांची संशयित बाजीराव पाटील याच्याशी जमिनीच्या व्यवहारामुळे ओळख होती. बाजीराव याने ‘मी कारागृहात अधिकारी असून माझी वरपर्यंत ओळख आहे, तुमच्या मुलाला वरिष्ठ लिपिक पदावर नोकरीला लावतो’, असे सांगून 15 लाख रुपयांची मागणी केली.
या आमिषाला बळी पडून देशमुख यांनी एका पतसंस्थेतून कर्ज काढून फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत 15 लाख रुपये संशयितांच्या बँक खात्यावर आणि रोख स्वरूपात दिले. काही महिने उलटूनही मुलाला नोकरी न मिळाल्याने देशमुख यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. यावर बाजीराव पाटील याने 15 लाख रुपयांचा धनादेश दिला, मात्र तो बँकेत वटला नाही.