मिरज : सरसकट मराठा आरक्षणासाठी सरकारला 27 ऑगस्ट या तारखेची डेडलाईन आहे. तोपर्यंत त्यांनी अंमलबजावणी करून अध्यादेश काढावा. अन्यथा 29 रोजी मुंबईत रेकॉर्ड ब्रेक मोर्चा निघणार आहे, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी मिरजेत पत्रकार बैठकीत दिला.
जरांगे म्हणाले, आज मिरजेत अनेक बैठका घेतल्या. सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र येत नाही, असे जे म्हणतात, त्यांना आजच्या बैठका ही चपराक आहे. मुंबईमध्ये जो मोर्चा होणार आहे, त्या मोर्चाला न भूतो न भविष्यती इतकी गर्दी दिसेल. शांततेत हा मोर्चा निघणार आहे. आम्हाला कोणताही धिंगाणा करायची इच्छा नाही. माझी तब्येत बरी नसल्याने ही शेवटची लढाई असेल. ही लढाई आम्ही जिंकणार आहोत. ओबीसीमधूनच मराठा समाजाचे आरक्षण घेणार आहे. मराठवाड्याचे हैदराबाद, पश्चिम महाराष्ट्राचे सातारा संस्थान आणि मुंबई सरकार, हे तीनही गॅझेटियर घेणार आहे. सगेसोयर्यांची अंमलबजावणी करून घेणार आहे. मराठा आणि कुणबी एकच, हेदेखील अध्यादेश अंमलबजावणीसह करून घेणार आहे. आता आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार आहे. मागे माघार घेतली त्यावेळी कायद्याचाही विचार केला. कायद्यात दुरुस्ती होणे महत्त्वाचे असते. 1967 पासून 2012 पर्यंत कायद्यात दुरुस्ती करीत करीत पोटजाती व उपजाती घातल्या गेल्या. आमचे आरक्षण हे ओबीसीतून आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचना काढली. 6 महिन्यांत अधिसूचनेच्या अंमलबजावणीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र दीड वर्षे झाली तरी अंमलबजावणी झाली नाही. इथेच आमची फसवणूक झाली. आम्ही लोकशाही, कायदा आणि संविधानाच्या आधारावर ही मागणी करीत आहोत. 56 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता आरक्षण द्यावेच लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 2017 नुसार आरक्षण लागू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कुणबी प्रमाणपत्र असणार्यांना लाभ मिळणारच आहे. तो त्यांनी घ्यावा. आम्हाला ज्या ज्या सुविधा आहेत, त्या आम्ही घेणारच.
ते म्हणाले, या आंदोलनासंदर्भात सरकारशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मी कधीही न विचारता थेट आंदोलनाची घोषणा करतो. जे आंदोलन ठरवून केले जाते, ते आंदोलन कधीही यशस्वी होत नाही. सरकारमधील नेत्यांशी देखील माझी चर्चा झाली नाही. त्यांनी 27 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा. तोपर्यंत त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. मी 27 ऑगस्टला आंतरवाली सराटी सोडले, तर मी कोणाचेच ऐकणार नाही. खरे तर आम्हाला चर्चा करून कंटाळा आला आहे. त्यांनी चर्चा करण्यापेक्षा आता निर्णयच द्यावा.