विटा : पुढारी वृत्तसेवा : पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही, यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. मात्र, या सगळ्या गोष्टींचे जे राजकारण होत आहे, ते चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे झालेल्या शाई फेक प्रकरणी एका पत्रकारावरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून राज्यातील पत्रकारांच्या विविध संघटना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे -फडणवीस सरकारला टीकेचे लक्ष बनवले आहे. याबाबत आमदार पडळकर यांना विचारले असता ते म्हणाले, पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार काय याच सरकारने केलेला नाही, यापूर्वी असे प्रकार घडले आहेत.
आटपाडी तालुक्याला टेंभू योजनेचे पाणी मिळावे म्हणून मी स्वतः आंदोलन केले होते. मात्र, ही बातमी कव्हर करायला आलेल्या सांगली जिल्ह्यातील विजय लाळे आणि सतीश भिंगे या पत्रकारांवर त्या वेळच्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारने गुन्हे दाखल केले होते. अद्याप ते गुन्हे मागे घेतलेले नाहीत. अजूनही कराडच्या कोर्टामध्ये त्याची केस सुरू आहे. दर महिन्याला हे पत्रकार आमच्याबरोबर कोर्टात हजेरी लावत असतात.
ठाकरे सरकार असताना राहुल कुलकर्णी यांनाही विद्यार्थी आंदोलनाच्या प्रकरणात अडकवले होते. त्यामुळे विरोधकांनी या सगळ्या गोष्टींचे राजकारण थांबवावे. मात्र, विरोधकांकडे कुठलाच मुद्दा नसल्यामुळे राज्य सरकारवर टीका करणे हेच एकमेव काम विरोधक करत आहेत. पत्रकारांच्या वरील गुन्ह्याच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या कडून राजकारण सुरू आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये ही पत्रकारांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. असे सांगत आमदार पडळकर यांनी यापूर्वी पत्रकारांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन पडळकर यांनी दिले.
हेही वाचलंत का ?