पलूस तालुक्यातील द्राक्षांची चवच न्यारी आहे. file photo
सांगली

पलूस तालुक्यातील द्राक्षांची चवच न्यारी

द्राक्षमाल काढणीची लगबग सुरू, यंदा बागायतदारांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा
हणमंत माळी

कुंडल : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने खवय्यांच्या जिभेवर भुरळ घालणार्‍या पलूस तालुक्यातील द्राक्षांना यंदाही चांगला दर मिळत आहे. पलूस तालुक्यातील द्राक्षबागा काही प्रमाणात सुरू झाल्या आहेत. बाजारपेठेत द्राक्षे दाखल होऊ लागली आहेत. शेती व्यवसायावर अनेक प्रकारची संकटे येऊन शेती बेभरवशाची झाली असतानाही, अथक् परिश्रम घेऊन जगवलेल्या द्राक्षांना चांगला दर मिळत असल्याने द्राक्ष बागायतदारांतून त्याचे स्वागत होत आहे.

खरे तर अनियमित पडणारा पाऊस, नैसर्गिक आपत्तीने शेतकर्‍यांसह बागायतदार शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. चालूवर्षी नोव्हेंबरपर्यंत कमी-जास्त प्रमाणात पाऊस सुरू होता. त्यामुळे द्राक्षबागांच्या छाटण्या उशिरा झाल्या. मजुरीचे वाढते दर, महागड्या औषधांची फवारणी, मशागतीचा खर्च करून द्राक्षे बाजारपेठेत दाखल होईपर्यंत द्राक्ष बागायदारांची दमछाक होते. कोट्यवधीचा आर्थिक भुर्दंड सहन करणार्‍या द्राक्ष बागायतदारांनी पुन्हा एकदा कंबर कसून रात्रं-दिवस काबाडकष्ट करत बागा फुलवून चांगले उत्पादन घेतले. आता जोखीम पत्करून सप्टेंबर छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांमधील द्राक्षे बाजारपेठेत दाखल होऊ लागली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांना चांगला दर मिळत असल्याने द्राक्ष बागायतदार समाधानी असल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT