सांगली : सोन्याच्या दरात एका दिवसात 4 हजार 450 रुपयांनी, तर चांदीच्या दरात तब्बल 13 हजार 850 रुपयांनी वाढ झाली. शनिवारी सोन्याचा दर जीएसटीसह प्रतितोळा 1 लाख 31 हजार 850 रुपये होता, तर चांदीचा प्रतिकिलो दर 1 लाख 77 हजार 350 रुपयांवर पोहोचला.
येथील सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर 1 लाख 27 हजार 400 रुपये होता, तर चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 63 हजार 500 रुपये होता. शनिवारी अचानक सोने-चांदीच्या दरात वाढ झाली. सोन्याचा एक तोळ्याचा दर जीएसटीसह 1 लाख 31 हजार 850 रुपये झाला, तर चांदीचा किलोचा भाव जीएसटीसह 1 लाख 77 हजार 350 रुपये झाला, अशी माहिती सांगली जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव सावकार शिराळे यांनी दिली. गेल्या चार-पाच महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे. यापूर्वी सोन्याचा विक्रमी दर 1 लाख 50 हजार, तर चांदीचा एक लाख 90 हजार रुपयावर पोहोचला होता.
लग्नसराईमळे दरवाढीने घेतला वेग
सध्या लग्नसराई असल्यामुळे सोने-चांदीतील दरवाढीने पुन्हा एकदा वेग घेतला असून सोने दीड लाखाच्या तर चांदी दोन लाखांच्या दिशेने वेगाने आगेकूच करीत आहे. सोने बाजारात शुक्रवारप्रमाणेच शनिवारही (दि.29) दरवाढीचा वार ठरल्याचे दिसून आले. शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे नागरिकांचा गुंतवणुकीचा कल सोन्याकडे वाढला आहे. त्यामुळे याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर उच्चांक गाठणार
तज्ज्ञांच्या मते नवीन वर्षात सोन्याचे दर पुन्हा एकदा उच्चांक गाठू शकतात. सोन्याच्या दराचा विद्यमान कल असाच राहिला तर हे दर आणखी वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठू शकतात. सोन्याच्या दराने 19 मार्च 2025 रोजी उच्चांक गाठला होता.
लग्नसराई : लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढते. यामुळे किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते.
डॉलरचे कमकुवत होणे : डॉलरच्या तुलनेत इतर चलनांमध्ये आणि मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक वाढते. त्यामुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहेत.
व्याजदरात कपातीची अपेक्षा : जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून व्याज दर कपात केली जाण्याची अपेक्षा असून त्यामुळे गुंतवणूकदार मौल्यवान धातूंमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
जागतिक बाजारपेठेतील घडामोडी : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात झालेली वाढ हेदेखील एक महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या गुंतवणूक व्याज दरात 25 बेसिस पॉईंटस्ने कपात होऊ शकते, असे वृत्त पसरले होते. जागतिक अर्थकारणातील या हालचालीचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर दिसून आला आहे. अमेरिकन गुंतवणूकदारांनी सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय निवडत सोने खरेदी वाढवली. त्यामुळे सोन्याचा दर दिवसाला एकदम पाच हजार रुपयांनी वाढला. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण हेही सोने दराच्या वाढीचे कारण आहे. सोने दरात झालेल्या वाढीचा परिणाम चांदी दरावरही झाला आहे. याशिवाय चांदीचा औद्योगिक वापर वाढल्याने त्याचाही परिणाम चांदीच्या दरवाढीवर होत आहे.- सिद्धार्थ गाडगीळ, पीएनजी, सांगली