विटा : कवलापूरात विमानतळ होण्यासाठी पुढच्या महिन्यात सर्वपक्षीय बैठक मुंबईमध्ये घेणार, तसेच म्हसवडमध्ये तीन हजार एकरची एमआयडीसी होण्याबाबत पुढच्या १५ दिवसांत केंद्रीय मंत्र्यांना भेटणार, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून सोने चांदी गलाई व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा देऊन एक कोटी पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. नॅशनल गोल्ड सिल्व्हर रिफायनर्स ज्वेलर्स असो.च्या महामेळाव्यात मंत्री सामंत बोलत होते.
यावेळी मंत्री सामंत म्हणाले, हा परंपरागत व्यवसाय आहे. मात्र नवी पिढी या व्यवसायात येत नाही. या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी नवीन पिढी यात आली पाहिजे. राज्यातील जेम्स अॅण्ड ज्वेलरीचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा अपप्रचार झाला. मात्र देशातील सर्वात मोठा जेम्स अॅण्ड ज्वेलरीचा पार्क नवी मुंबईत होत आहे. आपल्या गलाई व्यवसायिकांनी देशभर राज्याचे नाव वाढवले. महाराष्ट्राचा प्रामाणिक पणाचा संस्कार त्यांनी देशभर जपला.
ज्यावेळी काश्मीरमध्ये जायला लोक घाबरत होते, तेव्हा आमचे लोक लाल चौकात सोने-चांदी शुद्धी करण्याचा व्यवसाय करत होते, हे धाडस या लोकांत आहे. आगामी काळात देशभरात अर्थिक क्रांती करणारा हा महत्त्वाचा घटक आपल्या गावाकडे परतला पाहिजे आणि त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे. यासाठी उद्योग विभागाकडून एमआयडीसीच्या क्लस्टर योजनेत सोने-चांदी व्यवसायाला सुक्ष्म उद्योगाचा दर्जा देऊ, असेही मंत्री सामंत म्हणाले.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, आमदार सुहास बाबर यांच्या मागणीनुसार गलाई व्यवसायाच्या प्रश्नांसंदर्भात पुढच्याच महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करू. हा एक व्यवसाय आहे या व्यवसायाकडे बघण्याचा पोलीस खात्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातला हा विषय आहे. गलाई व्यवसाय ही एक इंडस्ट्री आहे. त्यामुळे यासाठीचे धोरण ठरवण्याची गरज आहे. तसेच देशभरात येणाऱ्या अडचणी सोडवायच्या असतील, तर देशपातळीवर विशेष समान कायदे झाले पाहि जेत. यासाठी एकत्रीतपणे दिल्ली दरबारी ताकद दाखवली पाहिजे, असेही ना. गोरे म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भारतात तब्बल ९०० टन सोने आयात होत आहे. देशाचे अर्थकारण बदलण्याची क्षमता असणारा हा व्यवसायात आहे. साखर संघाच्या धर्तीवर मुंबई, दिल्लीत कार्यालये उघडा. देशभरातल्या गलाई बांधवांना तिथे आधार मिळाला पाहिजे. नव्या पिढीसाठी सोने-चांदी व्यवसायातले छोटे-छोटे कोर्स तयार झाले पाहिजेत. परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे असेही चव्हाण म्हणाले.
तर फत्तेसिंह रांका म्हणाले, देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या या व्यवसायाला सरकारकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. भारताच्या एकूण जीडीपीच्या ६ ते ७ टक्के या व्यवसायामुळे तयार होत आहे. मात्र तरीही आमचा सगळा वेळ जीएसटी, टीडीएस, टी एस सी भरण्याची कागदपत्रे गोळा करणे आणि सरकारला जमा करण्यातच जात आहे. मात्र न घाबरता नव्या पिढीने या व्यवसायात आले पाहिजे.गलाईकारांनी आपला व्यवसाय जपला आणि वाढवला पाहिजे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांत हा व्यवसाय वाढतोय आपल्या इथे मात्र कमी होत आहे याची कारणे शोधून उपाययोजना करा. त्यासाठी आपले घर आणि बॅलन्सशीट मजबूत करा. माझी सातवी पिढी या व्यवसायात आहे, तरी आम्ही व्यवसाय बदलत नाही तुम्ही का बदलता? असा सवालही रांका यांनी केला.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, असो.चे सतीश प्रतापशेठ साळुंखे, सराफ संघटनेचे अध्यक्ष फत्तेसिंह रांका, गलाई असो. चे अध्यक्ष गणपतराव पुदाले, हॉलमार्क असो.चे राष्ट्रीय अध्यक्ष उदय शिंदे, सचिव संजय माने, शंकरनाना पवार, प्रकाश पाटील, शांताराम शिंदे, कार्याध्यक्ष बाळासाहेब माने, संजय माने यांच्यासह संघटनेचे सर्व संचालक, देशभरातले गलाई व्यावसायिक आदी उपस्थित होते.