कुंडल : कुंडल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दुधोंडी, नागराळे आणि दह्यारी या गावांमधून चोरीस गेलेले 11 बोकड आणि 10 शेळ्यांच्या प्रकरणात कुंडल पोलिसांनी दोघा संशयितांना पकडून जप्त केलेली रोख रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित सर्व फिर्यादी शेतकऱ्यांना सुपूर्द केली. चोरीच्या मुद्देमालापोटीचे 2 लाख 32 हजार रुपये उपनिरीक्षक जयसिंग पाटील यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना देण्यात आले.
याप्रकरणी समीर इकबाल मुल्ला (वय 36, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) आणि पवन धोंडिराम गावंडे (रा. रेठरे खुर्द, ता. कराड) यांना अटक करण्यात आली होती. संशयितांनी दुधोंडी परिसरातील दुधोंडी, दह्यारी, नागराळे येथील शेतकऱ्यांचे बोकड व शेळ्या चोरून त्यांची कत्तल करून, ते मटण स्वतःच्या दुकानातून विकल्याची माहिती तपासात उघड झाली होती.
दुधोंडी येथील किशोर वसंत आरबुने यांच्या 3 शेळ्या, रहीम सय्यद यांच्या 2 शेळ्या आणि 3 बोकड, तसेच दह्यारी येथील सुशांत नलावडे, रूपाली कचरे, प्रसाद पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतरांची मिळून 5 शेळ्या आणि 8 बोकड, अशी जनावरे चोरीस गेली होती.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने कुंडल पोलिस ठाण्याचे प्रभारी उपनिरीक्षक जयसिंग पाटील आणि पथकाने या प्रकरणाचा तपास करून संशयितांना ताब्यात घेतले. तपास मोहिमेत उपनिरीक्षक आय. एस. मुल्ला, सतीश पवार, विजय गावडे, परविन मुलाणी, प्रतीक संकपाळ, जमीर मुलाणी, धनाजी नायकल, एकनाथ भट्ट, प्रवीण माने, विशाल चंद, विशाल साळुंखे, नीलेश यादव आणि ज्योती फाटक यांनी सहभाग घेतला.