Fake Certificate Racket
गावडे युनिव्हर्सिटीचे बनावट सर्टिफिकेट रॅकेट उघड Pudhari News Network
सांगली

Fake Certificate : गावडे युनिव्हर्सिटीचे बनावट सर्टिफिकेट रॅकेट उघड

पुढारी वृत्तसेवा

विटा : शाळेची बनावट मार्कलिस्ट, डिग्री, दाखले आणि प्रमाणपत्रे तयार करून देणार्‍या सांगली जिल्ह्यातील शिगाव (ता. वाळवा) च्या गावडे युनिव्हर्सिटीच्या दोन गावडे बंधूंसह सांगली जिल्ह्यातील पाच आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक असे एकूण सहाजणांना विटा पोलिसांनी जेरबंद केले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातले शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे रॅकेट पकडण्यात यश आले आहे.

याप्रकरणी वाळवा तालुक्यातील शिगावचा रामचंद्र भाऊ गावडे (वय 82), अर्जुन भाऊ गावडे (52), गजानन रामचंद्र गावडे (43) या तीन गावडे बंधूंसह प्रमोद कृष्णात आमने (29, रा. काळमवाडी), शिवाजी नागनाथ यमगर (31, रा. वाळवा), काकासाहेब धोंडिबा लोखंडे (30, रा. वाळवा) आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील महेश महादेव चव्हाण (52) या सात जणांना विटा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, यातील पाच संशयितांना विटा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, लॅमिनेशन मशीन, मॉनिटर, वेगवेगळे प्रकारचे कागद, बनावट सर्टिफिकेट, कोरे शाळा सोडलेचे दाखले, बनावट बोर्ड सर्टिफिकेट, शिक्के, मार्कलिस्ट तयार करण्याकरिता लागणारे वेगवेगळ्या रंगाचे पेपर, वेगवेगळ्या मुलांचे बनावट सर्टिफिकेट साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत विट्यातल्या पोस्टाचे डाक निरीक्षक सुरेश एकनाथ काकडे यांनी फिर्याद दिली होती.

त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, लॅमिनेशन मशीन, मॉनिटर, वेगवेगळे प्रकारचे कागद, बनावट सर्टिफिकेट, कोरे शाळा सोडलेचे दाखले, बनावट बोर्ड सर्टिफिकेट, शिक्के, मार्कलिस्ट तयार करण्याकरिता लागणारे वेगवेगळ्या रंगाचे पेपर, वेगवेगळ्या मुलांचे बनावट सर्टिफिकेट साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत विट्यातल्या पोस्टाचे डाक निरीक्षक सुरेश एकनाथ काकडे यांनी फिर्याद दिली होती.

1 सप्टेंबर 2022 ते 7 सप्टेंबर 2023 या काळात प्रमोद कृष्णात आमने हा भारतीय पोस्ट विभागाचे डाकघर शाखा नेवरी येथे सहायक डाकपाल म्हणून नोकरीस होता. मात्र त्याने स्वतःचे दहावीचे प्रमाणपत्र, खोटे तयार करून ते नोकरीला लागताना सादर केले. त्यामुळे भारत सरकार आणि डाक विभागाची त्याने फसवणूक केली आहे, अशी फिर्याद विटा पोस्टाचे डाक निरीक्षक सुरेश काकडे यांनी 7 सप्टेंबर 2023 रोजीच विटा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून विटा पोलिसांनी प्रमोद आमने याला 29 नोव्हेंबर 2023 रोजी अटक केली होती. सध्या तो जामिनावर आहे.

मात्र तेव्हापासून सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील आणि विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरूच होता. याकामी विटा पोलिसांनी पथक तयार केले होते. यात उपनिरीक्षक पूजा महाजन - येळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार विलास मोहिते, गणपत गावडे, वैभव कोळी, कृष्णा गडदे, मधुकर माने, रमेश कुंभार, सोमनाथ पाटील यांचा समावेश होता.

आमने हा सध्या जरी जामिनावर मुक्त असला तरी त्याने स्वतः ची नोकरी मिळविण्यासाठी वाळवा तालुक्यातील शिवाजी यमगर आणि काकासाहेब लोखंडे यांना 1 लाख 25 हजार रुपये दिले होते. तसेच शिवाजी यमगर आणि काकासाहेब लोखंडे यांनी प्रमोद आमने यास, त्याला पोस्टात नोकरी देतो असे आमिष दाखवून गजानन गावडे, अर्जुन गावडे, रामचंद्र गावडे यांच्याकडून बोर्डाची बनावट सर्टिफिकेट मिळविल्याचे व दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर विटा पोलिसांनी शिवाजी यमगर आणि काकासाहेब लोखंडे यांची कोठडी घेऊन तपास केला. या दोघांनी आपल्याला गजानन गावडे, अर्जुन गावडे, रामचंद्र गावडे यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन देत असल्याचे सांगितले आहे. त्यावर मात्र विटा पोलिसांनी अर्जुन गावडे आणि गजानन गावडे यांना पकडून त्यांना पोलिस कोठडीमध्ये घेऊन तपास केला असता, त्यांच्या घरी वेगवेगळ्या शाळा, कॉलेजच्या मुलांचे शाळेचे दाखले आणि बोर्ड सर्टिफिकेट्स तसेच वेगवेगळ्या शाखांचे डिग्री सर्टिफिकेट असल्याचे आढळून आले.

दरम्यान, पोलिसांनी शिगाव येथे अधिक तपास केला असता संगणकामध्ये पारंगत असलेला महेश चव्हाण हा आणखी एक त्यांचा साथीदार असल्याचे आढळले. महेश चव्हाण याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे बनावट सर्टिफिकेट्स बनवून देण्याचे अन्य साहित्यही सापडले.

बनावट सर्टिफिकेटद्वारे नोकर्‍या मिळविणार्‍यांचा शोध सुरू

गावडे युनिव्हर्सिटीने गेल्या अनेक वर्षांपासून अनेक लोकांना शाळा, कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन आणि नोकर्‍यांकरिता बनावट कागदपत्रे तयार करून दिलेली आहेत. तसेच अनेक लोकांना या बनावट सर्टिफिकेटच्या साहाय्याने नोकर्‍याही मिळाल्या असण्याची शक्यता आहे. विटा पोलिसांनी अशा अनेक मुलांना तपासकामी बोलावून घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी गावडे युनिव्हर्सिटी, शिगावमधून बनावट कागदपत्रे तयार केली असल्याचे सांगितले आहे.

मुख्य संशयित रामचंद्र गावडे ऊर्फ गावडे सराला पॅरालिसिस

गावडे युनिव्हर्सिटीमध्ये असणारा रामचंद्र भाऊ गावडे याची ओळख तर ‘गावडे सर’ या नावाने असल्याचे सांगितले जात आहे. तो 82 वर्षाचा वयोवृद्ध आहे. शिवाय सध्या त्याला पॅरालिसिस झालेला आहे. त्याला विटा पोलिसांनी नोटीस दिलेली आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.

SCROLL FOR NEXT