वाळवा ः वैभवकाकांशिवाय संचालक, अधिकारी, सभासद आणि कार्यकर्ते मिळून यंदाचा गळीत हंगाम निश्चित यशस्वी करतील, असा विश्वास गौरव नायकवडी यांनी व्यक्त केला. कारखान्यासाठी बँकांनीही आर्थिक सहकार्य करण्यास मान्यता दिल्याची माहिती त्यांनी आंदोलकांसमोर गुरुवारी दिली.
गेल्या 18 दिवसांपासून हुतात्मा साखर कारखान्यासमोर सभासद व शेतकरी किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू आहे. वैभव नायकवडी यांनी तातडीने राजीनामा द्यावा तसेच कारखान्यावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची जबाबदारी स्वीकारावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.
गौरव नायकवडी म्हणाले की, यंदाचा गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व घटकांना विश्वासात घेऊन आतील कामांना सुरुवात केली आहे. आवश्यक कामांसाठी संचालक व अधिकारी निविदा प्रक्रिया राबवत आहेत. वैभव नायकवडी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईही सुरू करण्यात आली असून उद्यापासून विविध बँकांकडे आर्थिक प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे व्यवहार पारदर्शकपणे सुरू आहे.
केदार नायकवडी यांनी सांगितले की, कारखान्याकडे सध्या 14 हजार टन मळी शिल्लक आहे. त्यापैकी सुमारे 3 हजार टन मळी इथेनॉल प्रकल्पासाठी वापरली जाणार असून उर्वरित मळी विक्रीसाठी निविदा काढली जाणार आहे. आंदोलनात उमेश घोरपडे, संजय अहिर, पोपट अहिर, अधिक डवंग, वसंत वाजे, बाळासाहेब पाटील, ॲड. वरुण माने, बाजीराव नायकवडी, मानाजी सापकर यांच्यासह 15 गावांतील सभासद, संचालक, शेतकरी आणि निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.