विजय लाळे
विटा : समजा, दोन चोरांनी मिळून एकाला फसवले, पण त्या दोन चोरांपैकी एक चोर फारच हुशार निघाला अन् त्याने दुसर्या चोरालाही फसवले, तर या स्थितीला ‘चोरावर मोर’ असे म्हणतात. अगदी अस्साच प्रकार सांगली जिल्ह्यात घडलाय. तो ही चक्क एका गाव कोतवालीमध्ये !
त्याच झालं असं की, गेल्या आठवड्यात एका परराज्यात घरफोडी झाली. त्यामध्ये एका परदेशातील तिघा संशयितांना चारचाकी गाडीसह गाव कोतवालीतील अंमलदार आणि कोतवालांनी अगदी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले, शिवाय सोन्या-चांदीचा तब्बल कोटींवर अधिकचा मुद्देमाल जप्त केला.
गावकोतवाली मंडळींनी ही धाडसी कारवाई केली. त्याचे कौतुकही सार्यांनी केले. आता चोरीची घटना ज्या राज्यात घडली होती, तिकडच्या कोतवालीत ठाण्यात यासंबंधी गुन्हा-बिन्हा दाखल झाला होता. इकडे मूळ कोतवाली गावापासून चांगले शे-पावणे दोनशे फर्लांगावर पाठलाग करून चोरांना पकडून तो सोने- चांदीचा माल या मंडळींनी ताब्यात घेतला होता. विशेष म्हणजे पहिल्यांदाच जेवढा माल पकडला, तेवढाच माल परराज्यातल्या घरफोडीत चोरीस गेला होता म्हणे. परिणामी, 100 टक्के चोरी उघडकीस आली, असे स्पष्ट झाले होते. मात्र या चोरीच्या मालातील तब्बल 10 तोळे सोने मधल्यामध्ये गायब झाले. आता या सोन्याचे नेमके झाले काय ? याबाबत गाव कोतवालीतील मंडळींमध्ये एकमेकांकडे संशयाची सुई फिरली. त्यातच गावकोतवालीच्या वरिष्ठांनीही खास गावात येऊन या धाडसी कारवाईचे कौतुक केले, मात्र त्याच कारवाईत ‘चोरावर मोर’ होण्याचा प्रकार झाला. तो ‘मोर’ कोण ? सारेच चक्रावले.
पकडलेल्या गाडीत चोरांसोबत कोतवाल आणि काही अंमलदार बसले, पकडलेल्या सोन्यासह एक सोनार आणि काही अंमलदार मंडळी दुसर्या गाडीत बसले. आता दोन्ही गाड्या जेव्हा कोतवाली गावात आल्या, त्यावेळी मात्र गडबड लक्षात आली. ज्यांनी हे सोने गायब केले, त्याला इतरांनी हेरले. तीन दिवसांत गायब माल परत करण्याच्या बोलीवर त्याच्यावरील कारवाई तात्पुरती टळली, पण ढापलेले सोने थोडेच असे परत मिळते? अखेरीस या पराक्रमाबद्दल कोतवालीतून उचलबांगडी करून संबंधिताला आता जरा वरच्या अधिकार्याच्या कार्यालयात बदलीवर धाडले आहे. परंतु या ‘चोरावर मोरा’ची खुमासदार चर्चा तालुक्यात रंगली आहे.