सह्याद्रीनगर येथील मंगळवार बाजार परिसरात झालेल्या गुंडाच्या खुनातील संशयितांना संजयनगर पोलिसांनी अटक केली. Pudhari Photo
सांगली

Sangli Crime News | गुंडाचा खून वर्चस्ववादातून

अल्पवयीन मुलासह चार संशयित पाच तासात जेरबंद; संजयनगर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सह्याद्रीनगर परिसरातील मंगळवार बाजार येथे सराईत गुन्हेगार मुबारक ऊर्फ फुलवा ऊर्फ हकीकउल्ला हसीउल्ला शाह (वय 37) याचा खून पूर्वीचा वाद व वर्चस्ववादातून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या खूनप्रकरणी संजयनगर पोलिसांनी पाच तासात चौघांना अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. अन्य दोघे संशयित पसार आहेत.

तुषार संजय झिंगरूटे (वय 24, रा. भाग्योदय सोसायटी, चैतन्यनगर पेट्रोल पंपाजवळ), श्रीकांत दुर्योधन ढगे (21, रा. अयोध्यानगर, सटाले मळा, सांगली), तन्वीर हरुण जमादार (23, रा. दडगे प्लॉट, चैतन्यनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. खुनातील संजय गडदे व अमन नगारजी हे दोघे पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी संजयनगर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

फुलवा शाह हा सराईत गुन्हेगार होता. तो भंगार व्यावसायिक होता. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास तो व त्याचा मित्र अझरुद्दीन हे सह्याद्रीनगर येथे आले होते. तेथील रिक्षा थांब्याजवळ तो बाकावर बसला होता. त्यावेळी संशयित सहाजण दुचाकींवरून तेथे आले. तुषार झिंगरूटे याच्याशी काही दिवसांपूर्वी फुलवा व त्याच्या साथीदाराचा वाद झाला होता. या रागातून संशयितांनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर फुलवा हा तेथून रेल्वे स्टेशनच्या बाजूला पळत सुटला. एका प्रार्थनास्थळासमोर त्याला गाठून संशयितांनी धारदार शस्त्रे व दगडाने ठेचून त्याचा खून केला. त्यानंतर संशयित पसार झाले होते.

खुनाच्या घटनेनंतर संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण स्वामी व पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संशयितांची नावे निष्पन्न झाली. संशयितांच्या शोधासाठी तत्काळ पथके रवाना करण्यात आली. संशयित तुषार झिंजरूटे व श्रीकांत ढगे हे मिरज रेल्वेस्थानक परिसरात असल्याची माहिती अंमलदार कपिल साळुंखे व संतोष पुजारी यांना मिळाली. तेथे पोलिस पथकाने तातडीने छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले. तिसरा संशयित तन्वीर जमादार हा कसबे डिग्रज (ता. मिरज) स्मशानभूमीजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले. तुषारसोबत झालेल्या भांडणाच्या रागातूनच काटा काढण्याची कबुली संशयितांनी दिली.

कारवाईत उपअधीक्षक विमला एम., निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किरण स्वामी, कपिल साळुंखे, संतोष पुजारी, दीपक गायकवाड, असिफ सनदी, शरद वंजारी, अशोक लोहार, सूरज सदामते, अनिकेत शेटे, ऋषिकेश खोचगे, हणमंत कांबळे, सुशांत लोढे, सूरज मुजावर यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT