सांगली : गांधीधाम - बंगळूर एक्स्प्रेसमधून चोरट्याने प्रवासी महिलेचे तीन लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शिवानी प्रतीक जाधव (रा. बडोदा, गुजरात) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शिवानी जाधव या बडोद्यातील असून त्या सांगलीत नातेवाईकांकडे आल्या आहेत. दरम्यान, त्या बडोदा ते सांगली स्थानकापर्यंत गांधीधाम एक्स्प्रेसमधील वातानुकूलित बोगीतून प्रवास करीत होत्या. त्यांनी त्यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, रिंगा असा 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल प्रवासी बॅगेत ठेवला होता. दि. 26 रोजी दुपारी त्या सांगली स्थानकात पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन बॅगेची पाहणी केली, त्यावेळी त्यांना बॅगेत दागिने दिसून आले नाहीत. बडोदा ते सांगली या प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतून दागिने चोरल्याचे समोर आले. याबाबत त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
रेल्वेच्या जनरल व स्लीपर बोगीतून प्रवाशांचे साहित्य चोरीस गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु आता वातानुकूलित बोगीतूनही प्रवासी महिलेचे दागिने चोरीस गेल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. वातानुकूलित बोगीमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, तिकीट तपासणीस असतानाही चोरी झाल्याने रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.