सांगली : कवठेपिरान (ता. मिरज) येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा व सांगली ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी जुगार खेळणार्या 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले सर्वजण सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकडून 30 दुचाकी, चारचाकी वाहने, रोख रक्क्कम व जुगाराचे साहित्य, असा 19 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे कवठेपिरान परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चार दिवसांपूर्वी मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार पोलिसांच्या विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून 61 जणांना ताब्यात घेतले होते. यानंतर रविवारी कवठेपिरान येथे छापा टाकून जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. कवठेपिरान-दुधगाव रस्त्यावर हा जुगार अड्डा सुरू होता. याबाबतची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्या आधारे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने सायंकाळी जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
कारवाईत जुगार खेळणार्या 17 जणांना ताब्यात घेण्यात आले. आशिष संजय केरीपाळे, रोहित नारायण पाटील, प्रकाश भाऊसाहेब पाटील, अनिकेत अरुण चौगुले, प्रशांत बाळासाहेब पवार (सर्व रा. कवठेपिरान), अनिल आदिनाथ पाटील, आलम रहमान मुजावर (दोघे रा. कुंभोज, ता. हातकणंगले), अभयकुमार महावीर कोले, गणेश महादेव पाटील (दोघे रा. दुधगाव, ता. मिरज), सुनील रघुनाथ चव्हाण, सूरज सिकंदर तांबोळी (दोघे रा. कसबे डिग्रज, ता. मिरज), उस्मान कुतबुद्दीन मगदूम (रा. सांगली), सुरेश शामराव खोचेकर (रा. खोची, ता. हातकणंगले), अमोल संपत राजमाने, बिरदेव रामचंद्र बंडगर (दोघे रा. हातकणंगले), शुभम राजेश पाटील, तुषार जालिंदर गावडे (दोघे रा. वाळवा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून 30 दुचाकी, एक चारचाकी, जुगारातील रोख रक्कम 85 हजार 100 रुपये, 16 मोबाईल, जुगाराच्या पत्त्याचे बॉक्स, टेबल, खुर्च्या, असा 19 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळणार्या 17 जणांना रात्री सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कारवाईत संजयनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण स्वामी, हवालदार गजानन जाधव, सुरेश पवार, दत्तात्रय फडतरे, अक्षय जाधव, प्रशांत सूर्यवंशी, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याकडील उपनिरीक्षक तांबोळी, सहाय्यक फौजदार मेघराज रुपनर, संभाजी पवार, रणजित घारगे, बंडू पवार, अभिजित पाटील, हिम्मत शेख यांनी सहभाग घेतला.
कवठेपिरान येथील जुगार अड्डा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याशी संबंधित असल्याची चर्चा होती. जुगार अड्ड्यावर छापा टाकून 17 जणांना ताब्यात घेतल्याचे समजताच संबंधित पदाधिकारी ग्रामीण पोलिस ठाण्याबाहेर घुटमळत होता, असेही प्रत्यक्षदर्शनी सांगितले.