ईश्वरपूर : ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून ऊस वाहतूकदाराची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर जिल्ह्यातील मुकादमावर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोहन जयसिंह राठोड (रा. बाराकोटी तांडा, ता. विजापूर, जि. विजापूर) असे संशयिताचे नाव आहे.
फसवणुकीचा हा प्रकार गेल्यावर्षी जून ते ऑक्टोबर महिन्यात घडला होता. वाहतूकदार रमेश दिनू चव्हाण (वय 44, रा. कामेरी) यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सन 2025-26 या ऊस गळीत हंगामासाठी मुकादम मोहन याने रमेश यांना 12 ऊसतोड मजूर पुरवतो, असे आमिष दाखवले होते. 16 जून 2025 ते 28 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हंगामासाठीची उचल म्हणून रमेश यांच्याकडून रोख व ऑनलाईन असे 8 लाख 45 हजार रुपये मोहन याने घेतले.
ऊस हंगाम सुरू झाला तरी मोहन याने रमेश यांना मजूर पुरवले नाहीत. तसेच त्यांच्याकडून घेतलेले पैसेही परत केले नाहीत. पैशाची मागणी केली असता मोहन उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर रमेश यांनी पोलिसांत धाव घेत त्याच्याविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.