सांगली : शेअर मार्केटमधील कंपनीत गुंतवणूक केल्यास बँक व्याजदरापेक्षा जादा रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 12 लाख 83 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी भीमसिंग भगतसिंग रजपूत यांनी तिघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मारुती गडदे, शालन मारुती गडदे आणि जालिंदर मारुती गडदे (सर्व रा. नागठाणे फाटा, ता. पलूस) यांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी, फिर्यादी भीमसिंग हे ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक आहेत. वरील तिघांना त्यांनी शेअर मार्केटमधील फॉरेक्स शेअर आणि इंडियन शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवल्यास बँक व्याजदरापेक्षा जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार भीमसिंग यांनी संशयितांकडे तब्बल 12 लाख 83 हजार रुपयांची रक्कम दिली.
परंतु इतकी मोठी रक्कम देऊन देखील जादा परवाना मिळाला नाही. त्यामुळे भीमसिंग यांनी संशयितांकडे गुंतवणूक केलेल्या रकमेची मागणी केली. परंतु संशयितांनी रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भीमसिंग यांनी संशयितांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.