सांगली : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे सर्वच्या सर्व म्हणजे चार न्यायमूर्ती मंगळवार 16 डिसेंबर रोजी सांगली दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रणेते व भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि राज्याचे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे अनावरण होणार असल्याची माहिती सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे यांनी दिली.
सायंकाळी 6 वाजता विजयनगर येथील जिल्हा न्यायालय परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमास न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, न्यायमूर्ती ए. एस. कडेठाणकर उपस्थित राहून वकिलांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमांचे अनावरण होणार आहे.
प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश एन. के. ब्रम्हे, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती संजश्री घरत, प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे व जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. वकील संघटनेचे उपाध्यक्ष महावीर गायकवाड, सचिव दीपक कदम यावेळी उपस्थित होते.