सांगली

विशाल पाटील यांच्या विजयाने नांदी करायची : डॉ. विश्वजित कदम

Arun Patil

पलूस, पुढारी वृत्तसेवा : दीड महिन्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, कृष्णा व आरफळ योजनेच्या पाण्यासाठी वेळ मागत होतो. राजकारण करताना मी कुणाला घाबरत नाही. पाच राज्यांतील खासदार निवडण्याची जबाबदारी सोनिया गांधी यांनी मला दिली आहे. एवढा विश्वास पक्षाने आमच्यावर दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या विजयाची नांदी सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयाने करायची आहे, असे मत माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.

ते पलूस तालुक्यातील बुर्ली – सूर्यगावदरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार मोहनराव कदम उपस्थित होते. यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत, सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड उपस्थित होते.

कदम पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाचे सचिन पायलट यांनी राजस्थानच्या गौरवशाली कार्यात भर टाकत विकास केला. त्यामुळेच त्यांना पक्षाने उपमुख्यमंत्रिपदाची संधी दिली. पलूस कडेगाव मतदार संघाचे डॉ. पतंगराव कदम यांच्याशी 35 वर्षांचे संबंध आहेत. 1980-85 च्या दशकात डॉ. पतंगराव कदम यांनी मोठा संघर्ष केला. लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठीची धमक त्यांच्यात होती. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाळांना मान्यता दिली.

महापुराच्या काळात लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बुर्ली-सूर्यगाव पुलासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला. पलूस तालुक्यात सव्वाचारशे कोटींचा निधी खेचून आणला. राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आणून बुर्ली-सूर्यगाव दरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलाचे उद्घाटन करणार असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, विरोधकांनी पाण्यासाठी राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला कोण ओळखते, असे ते म्हणाले. जिल्ह्याचे भावी खासदार विशाल पाटील… असे म्हणताच उपस्थित लोकांनी घोषणा दिल्या.

सध्याच्या खासदारांना हिंदीत बोलता येत नाही : विशाल पाटील

विशाल पाटील म्हणाले, काँग्रेस पक्ष परत एकदा उभारी घेत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याने नवीन नेतृत्वाला संधी मिळणार आहे. भविष्यकाळात डॉ. विश्वजित कदम हे राज्याचे नेतृत्व करतील. मी ज्या विमानात बसणार आहे, त्या विमानाचे पायलट विश्वजित कदम असणार आहेत. विश्वजित यांचा कामाचा आवाका मोठा असल्याने ते आमचे नेते आहेत. आज स्टेजवर अनेकांनी हिंदीमध्ये भाषणे केली. त्यामुळे मी लोकसभेत गेलोय का, याचा भास झाला. आताच्या खासदारांना हिंदीच बोलता येत नसल्याने ते जिल्ह्यातच फिरत असतात. दुसर्‍याच्या विकास कामाचा नारळ फोडण्याचे काम सध्याचे खासदार करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT