चार्‍याची टंचाई 
सांगली

शिराळा तालुक्यात चार्‍याची टंचाई

वैरणीला सोन्याचा भाव; पशुधनपालक शेतकरी हतबल

पुढारी वृत्तसेवा
महेश कुलकर्णी

शिराळा शहर : शिराळा हा डोंगरी तालुका मानला जातो. परंतु, जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा शिराळा तालुक्यात पडतो. त्यामुळे चार्‍याची कमतरता शक्यतो भासत नाही. परंतु, यावर्षी मात्र तालुक्यात चारा टंचाईचे संकट मार्चच्या सुरुवातीपासूनच भेडसावू लागले आहे. ओल्या चार्‍याची देखील कमतरता भासू लागल्याने उन्हाळा सुरू होण्याअगोदरच सुक्या चार्‍याचे दर गगनाला भिडल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. जनावरांना मिळणारे उसाचे वाढे कमी होऊन लागले आहे. त्यामुळे ओला चारा मिळत नाही. याचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे. यामुळे भेडसावत असलेल्या चाराटंचाईने शेतकरी हतबल झाला आहे, तर ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

यंदा पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे वारणाकाठ आणि तालुक्यात ऊसपट्ट्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली होती, तर परतीच्या व अवकाळी पावसाने गवताची वाढ झाली नाही. रब्बी हंगामात केलेली पिके काही अपवाद वगळता पाण्याअभावी वाया गेली आहेत. परिणामी, चार्‍याचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. जनावरांना जगविण्यासाठी शेतकर्‍यांनी स्वतःच्याच शेतातील उभा ऊस कापून घालण्यास सुरुवात केली आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने तसेच रब्बीचीही काढणी, मळणी सुरू असल्याने शेतकरी स्वतःसाठी आधी वैरणीची तजवीज करत आहेत.

रब्बीचे क्षेत्रही जवळपास 50 टक्के कमी झाले आहे. परिणामी सुका चाराही उपलब्ध झालेला नाही. शेतीवरच दूध व्यवसाय अवलंबून आहे. आता चार्‍याअभावी यात कमालीची घट झाली आहे. ज्यांचे उसाचे जास्त क्षेत्र आहे, त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून हा ऊस कापून जनावरांना घालत, वैरणीला विकला होता, तर अनेकांचे ऊसक्षेत्र कमी असल्याने त्यांच्या व्यवसायात कमालीची घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. गवताला महत्त्व आले असून गवत 7 ते 8 हजार रुपये शेकडा झाले आहे, तर शाळू कडबा 3 ते 4 हजार रुपये शेकडा झालेला आहे. अजूनही दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पशुधनाला धोका

शिराळा तालुक्यात गाय वर्ग 26 हजार 496, म्हैस वर्ग 45 हजार 898, शेळ्या - मेंढ्या 14 हजार 782, कुक्कुट 1 लाख 57 हजार 806, डुकरे 200, कुत्री 3198 असे एकूण 2 लाख 48 हजार 380 पशुधन आहे. चाराटंचाई तीव्र झाली, तर दुभते पशुधन कमी होण्याचा धोका आहे.

खाद्यांचे दर गगनाला

दूध उत्पादक शेतकरी रोहिदास हसबनीस म्हणाले, अगोदरच खाद्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर सध्या भेडसावत असलेली ओल्या व सुक्या चार्‍याची टंचाई, त्यामुळे गतवर्षीपेक्षा दुपटीने दरात वाढ झाली आहे. परिणामी खर्चाचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे. निसर्गाने साथ दिली नाही, तर पोटच्या पोराप्रमाणे जपलेले पशुधन मातिमोल दराने विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर येण्याचा धोका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT