कृष्णा, वारणाकाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा  
सांगली

Krishna Flood Alert : कृष्णा, वारणाकाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सांगलीत आयर्विन पुलाखाली पाणी पातळी ३२ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सांगली : कृष्णा, कोयना व वारणा नदीच्या धरण तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयना व वारणा यांसारख्या प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी रविवारी दुपारपर्यंत ३० ते ३२ फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. कोयना धरणातून ३३ हजार ८२६ क्युसेक, वारणा धरणातून ६ हजार ९०० क्युसेक, धोम धरणातून ८ हजार २१९ क्युसेक आणि कण्हेर धरणातून ६ हजार ७२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच उरमोडी, तारळी व राधानगरी या धरणांमधूनही पाण्याचा प्रवाह सुरू असून कर्नाटकातील अलमट्टी धरणातून १ लाख १० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

शनिवारी दुपारी २ वाजता आयर्विन पुलाजवळ नदीची पातळी २६ फूट २ इंच नोंदवली गेली, तर हरिपूर येथील अंकली पुलाजवळ ती २७.२ फूट इतकी होती. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी पूर्ण सतर्क राहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी केले आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून कडेगाव तालुक्यात सर्वाधिक २९.१ मि.मी. पाऊस पडला आहे. त्यापाठोपाठ पलूस तालुक्यात २७ मि.मी., वाळवा तालुक्यात २६.१ मि.मी. आणि शिराळा तालुक्यात २२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT