बोरगावच्या भातशेतीत जलपक्ष्यांचा मेळा  
सांगली

Sangli News : बोरगावच्या भातशेतीत जलपक्ष्यांचा मेळा

ईश्वरपूर-ताकारी मार्गावर निसर्गप्रेमींची गर्दी; चमचा, शराटी, जांभळी पाणकोंबडीचे दर्शन

पुढारी वृत्तसेवा

पलूस : पलूस तालुक्यातील बोरगाव येथील भातशेतीमध्ये विविध जलपक्ष्यांचा वावर पाहायला मिळत आहे. ईश्वरपूर–ताकारी मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र बनला आहे. हिरवीगार भातशेती, रिमझिम पाऊस आणि पाणथळ भागात मुक्तपणे संचार करणारे शेकडो पक्षी, यामुळे परिसराला जणू नैसर्गिक पक्षीअभयारण्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

भातशेतीमध्ये चमचा हा आपल्या चमच्यासारख्या चोचीने पाण्यातील लहान मासे, कीटक व जलचर शोधताना दिसत आहे. शराटी आपल्या लांब वाकड्या चोचीने चिखलात अन्न शोधताना दिसतो. जांभळी पाणकोंबडी आपल्या निळसर-जांभळ्या रंगामुळे लक्ष वेधून घेत असून ती भाताच्या पाणथळ भागात सहज वावरताना दिसत आहे. याशिवाय बगळे आणि लहान बदके मोठ्या संख्येने या शेतात दिसून येत आहेत. काही पक्षी पाण्यात डुबकी मारून अन्न शोधत आहेत, तर काही हवेत उंच भरारी घेत पुन्हा शेतात उतरून निसर्गप्रेमींना मोहिनी घालत आहेत.

या देखण्या पक्ष्यांच्या हालचाली पाहण्यासाठी ईश्वरपूर–ताकारी मार्गाने जाणारे अनेक प्रवासी वाहन थांबवून छायाचित्रे आणि व्हिडीओ काढताना दिसत आहेत. पावसाळ्याच्या वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट आणि हिरवाईने नटलेली शेते यामुळे हा परिसर छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT