विटा; पुढारी वृत्तसेवा : कृष्णेत दरमहा पाच टीएमसी पाणी सोडणार तसेच गुरुवारपासून पात्रात पाणी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार अनिल बाबर यांनी आज (दि. २२) सांगितले.
कृष्णा नदीतून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील नदीचे पात्र बहुतेक ठिकाणी कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठासह अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सतत होत होती. जिल्ह्यातील खासदार, आमदार यांचाही पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू होता मात्र पाणी सोडले जात नव्हते. याप्रकरणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्याकडे बोट दाखविले जात होते. मात्र याबाबत शिंदे गटाचे सांगली जिल्ह्यातील आमदार अनिल बाबर यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या पाण्याची सद्यस्थितीची कल्पना दिली. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी गरजेचे आहे, त्यामुळे कृष्णा नदीमध्ये कोयना धरणातून दरमहा पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिली आहे. शिवाय दरमहा महिन्यातून कृष्णा नदीमध्ये पाच टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात नियोजन करण्याचेही आदेश दिले आहेत, असेही आमदार बाबर यांनी सांगितले.