तासगाव : दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना तासगाव पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एक लाख नव्वद हजाराच्या पाच दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी महेश शीतल कोळी (रा. निमणी) यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिली. रोहित संजय जावळे (वय 23) व सुखलाल ऊर्फ नांज्या गुंडू शिंदे (वय 22, दोघे रा. इंदिरानगर तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक शेवाळे म्हणाले, शहर आणि परिसरात असणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची तपासणी करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील अमर सूर्यवंशी यांना दोन तरुण काशीपुरा गल्ली ते इंदिरानगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील असणाऱ्या स्मशानभूमीजवळ दोन दुचाकी घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली.
अंमलदार सूर्यवंशी, अमित परीट, प्रशांत चव्हाण, विवेक यादव, सूरज जगदाळे व बजरंग थोरात यांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. तेथे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी तासगाव, पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन, तर पलूस, कवठेमहांकाळ व सांगली शहर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून प्रत्येकी एक, अशा पाच दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.