शिराळा : तालुक्यातील वारणा नदीवरील आरळा-शित्तूर पूल पाण्याखाली गेल्याने शाहूवाडी तालुक्यातील वाहतूक बंद झाली.  Pudhari Photo
सांगली

शिराळा तालुक्यात पाच पूल पाण्याखाली

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : पुढारी वृत्तसेवा

शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, वारणावती, चरण परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. वारणा व मोरणा नदीला पूर आला आहे. वारणा नदीवरील पाच पूल पाण्याखाली गेले आहेत.गुरुवारी सकाळी आरळा-शिरूर पूल पाण्याखाली गेला. चरण ते सोंडोली व कोकरूड-शित्तूर पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तालुक्यातील मांगले-सावर्डे, मांगले -कांदे, कोकरूड-रेठरे हे पूल पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक बंद करण्यात आली आहे. चांदोली धरण व अभयारण्य परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने चांदोली धरणातील विसर्ग वाढवला आहे.

मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. सोनवडे सावंतवाडी येथील काशीनाथ सावंत व नामदेव खोत यांच्या तसेच सोनवडे खोतवाडी येथील निवृत्ती राणे यांच्या घराच्या भिंती पडल्या. 24 जुलै रोजी चांदोली धरणातून विसर्गात वाढ केली आहे. वक्रदारातून 7216 क्युसेक व विद्युत जनित्रामधून 1658 क्युसेक असा एकूण 8874 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- जी. एम. पाटील, उपअभियंता, चांदोली धरण
लघु पाटबंधारे उपविभागांतर्गत शिराळा तालुक्यामध्ये एकूण 49 पाझर तलाव आहेत. या तलावातील पाणी साठवण क्षमता 236.41 दशलक्ष घनफूट इतकी असून, सद्य:स्थितीत 215.19 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच 11 सिमेंट नाला बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या बंधार्‍यातील पाणी साठवण क्षमता 4.52 दशलक्ष घनफूट इतकी असून, सद्य:स्थितीत 4.52 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
- प्रवीण तेली, उपविभागीय जलसंधारण अधिकारी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT