माधवनगर : माधवनगर - अहिल्यानगर रस्त्यावरील चार दुकाने शुक्रवारी मध्यरात्री जळून खाक झाली. आगीत मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी संजयनगर पोलिसात गुन्हा झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील ड्रायफ्रूट्स व मिरची, मसाला दुकानाचे गोडाऊन, दुचाकी वाहनांची गॅरेज, सलून व इलेक्ट्रिक दुकान, अशी चार दुकाने जळून खाक झाली. याप्रकरणी ड्रायफ्रूट दुकानाचे मालक श्रीकांत उर्फ देवा जाधव यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास सुरू आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान ही आग लागली. मिरची गोदामास आग लागल्यानंतर त्या मिरचीच्या ठसक्यामुळे शेजारचे लोक जागे झाले. तोपर्यंत सलून व इलेक्ट्रिक दुकान जळून खाक झाले. शेजारच्या लोकांनी सुरुवातीला देवा जाधव व अग्निशमन दलाला फोन केला आणि घरातील पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच अग्निशमन दलाची दोन वाहने आली. त्यांनी काही मिनिटात आग आटोक्यात आणली.
मकर संक्रांतीनंतर ड्रायफ्रूट व मिरची मसाल्याचे दर तेजीत असतात. म्हणून चार दिवसांपूर्वीच देवा जाधव यांनी सुमारे पाच लाखांचा माल भरून या गोडाऊनमध्ये ठेवला होता. तो संपूर्ण जळून खाक झाला. याशिवाय गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या पाच दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. या दुकानाच्या पाठीमागे झोपडपट्टी असून वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.