सांगली

चांदोली अभयारण्य परिसरात वणवा

अमृता चौगुले

वारणावती; पुढारी वृत्तसेवा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या चांदोली बुद्रुक येथील जानाईवाडीनजीक असलेल्या डोंगरास गुरुवारी दुपारी अज्ञातांकडून आग लावण्यात आली. या आगीमुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले. वन्यजीव कर्मचार्‍यांकडून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. चांदोलीचे वनपाल यांच्या मते, अडीच एकर क्षेत्रात आग लागली होती. मात्र, हे क्षेत्र जास्त असण्याची शक्यता आहे.

अभयारण्य परिसरात वणवा लागण्याची या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. वार्‍याच्या वेगामुळे आग सगळीकडे पसरत होती. धुराचे लोट परिसरात पसरले होते. या आगीमध्ये डोंगररांगातील झाडे-झुडपे अनेक जीवजंतू, सरपटणारे प्राणी, जळून खाक होत असून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे.

या डोंगररांगामध्ये आंबा, जांभूळ, सागवान, निलगिरी, अशोका, भेडा, गेळी, अंजनी, कुंभा, आंबिरा, हिरडा, नरक्या अशा विविध प्रकारच्या झाडांप्रमाणे करवंद, तोरणा, आवळा अशी झुडपे आहेत. अभयारण्याला लागूनच या डोंगररांगा असल्याने अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व या डोंगररांगामध्ये टिकून आहे. आगीत सरपटणारे प्राणी, दुर्मिळ व औषधी वनस्पती तसेच अनेक वन्यजीव जळून खाक होत आहेत.

मार्च एप्रिल महिना सुरू झाला की चांदोली परिसरात वनवे पेटू लागतात.अज्ञातांकडून असे कृत्य केले जाते. मात्र वणवा पेटविणारा अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे दरवर्षी असे प्रकार वाढू लागलेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT