विटा : अखेर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली. तसेच यासाठी तब्बल १४१ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणाही मंत्री पाटील यांनी केली. याबाबत आमदार सुहास बाबर यांनी 'पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन' व्दारे मागणी केली होती. त्यास आमदार गोपीचंद पडळकर यांनीही उचलून धरले. या मागणीसाठी मतदारसंघातील लोकांच्या भावना तीव्र असून जनआंदोलन होण्यापूर्वी उपकेंद्राची घोषणा करण्याची आग्रही मागणी आमदार बाबर यांनी केली होती. त्यावर मंत्री पाटील यांनी तशी थेट घोषणा केली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपिचंद पडळकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा मुद्दा मांडला. उपकेंद्र खानापूर येथेच व्हावी, अशी मागणी लावून धरली. हे विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, ही मागणी जुनीच आहे. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी पाठपुरावा केला होता. खानापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. उपकेंद्राबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने पाठवला आहे. जागेची उपलब्धता असल्याबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे. यासाठी जवळ पास १४१ कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. ही जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उपकेंद्राची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. तसेच केवळ उपकेंद्र करून चालणार नाही, काही पदवीका आणि पदव्यूत्तर उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी व्हावेत, यासाठी विद्यापीठ पुढे कार्यवाही करेल, असेही मंत्री पाटील यांनी जाहीर केले.
त्यानंतर आमदार सुहास बाबर आणि गोपीचंद पडळकर यांनी विधीमंडळा बाहेर पत्रकारांशी संयुक्त वार्तालाप केला. आमच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिसाद देत खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, यासाठी मंजूरी दिली त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सांगलीचे पालकमंत्री आहेत. त्यांच्यामुळे विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे, असेही आमदार बाबर यांनी सांगितले आहे.